पंढरपूरात पाळला कडकडीत बंद; एसटी सेवा बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको | पुढारी

पंढरपूरात पाळला कडकडीत बंद; एसटी सेवा बंद, ठिकठिकाणी रास्ता रोको

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यांतील अंतरवाली सराटी गावातील आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीमारानंतर राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले. पंढरपूरात शनिवारी तिरडी मोर्चा काढत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले तर रविवारी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान, मराठा समाज बांधव व सर्व पक्षीय संघटना व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रीत येत निषेधाच्या घोषणा दिल्या. तर शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना देखील पंढरपूरबंदचा फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

दरम्यान, पंढरपूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही भोसेपाटी, वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर खर्डी येथेही समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक जाहीरपणे गाव बंद ठेवून आंदोलन करण्यात आले तर अनेक गावात स्वयंस्फुर्तीने गाव बंद ठेवून महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व मराठा समाज बांधवांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली. तर यानंतर सकाळी 11.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा सुरु करण्यात आला. शहरातून मोर्चा काढून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. भोसले यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाला व्यापारी महासंघाने देखील पाठिंबा दिल्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र शहरात व उपनगरातही दिसून येत होते. एसटी सेवा बंद असल्यामूळे भाविकांची संख्या देखील पंढरपूरात कमी दिसून येत होती. नेहमी गर्दी असलेले बहुतांश रस्ते निर्मनुष्य दिसत होते. तर ग्रामीण भागातही एसटी बस रविवारी धावली नाही. परिणामी नागरिक शहराकडे आले नाहीत. खासगी वाहनाने किंवा स्वत:च्या वाहंनाने नागरिक शहरात जर आले तर त्यांना बाजारपेठ बंद असल्यामूळे रिकाम्या हाताने माघारी परतावे लाागले आहे. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

याप्रसंगी मनसेचे शशिकांत पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजुर्नराव चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, कोळी महासंघाचे अरुणभाऊ कोळी,सुनील पाटील, विनोद लटके, तानाजी मोरे, अमोल आटकळे, विजय काळे, सुमित शिंदे आदींसह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.

…तरच पंढरपूरला या

मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्यात यावी, मराठा आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाच्या मागण्या अगोदर पुर्ण करा आणि मागच पंढरपूरला शासन आपल्या दारी, या कार्यक्रमाला या. अन्यथा कार्यक्रम उधळवून लावू, असा इशाराच आंदोलनकर्त्यांनी शासनाला दिला आहे.

विकेंड असूनही मंदिर परिसरात शुकशुकाट

महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याने पंढरपूरातही बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे शहरातील सर्वच दुकानदारांची दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठे कडकडीत बंद होती. अशीच परिस्थिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराकडे दिसून येत होती. ऐरव्ही श्रावण महिन्यात विकेंडला रविवारी पंढरीत लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, बंद मुळे भाविक पंढरपूरला फिरकले नसल्याचे चित्र दिसून येत होते.

-हेही वाचलं का 

Rise Up : राईज अप स्पर्धा राज्यस्तरावर पोहोचावी; प्रसिध्द युवा उद्योजक पुनित बालन यांचे प्रतिपादन

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक बंद: जुळेवाडी खिंडीत गॅस टँकर उलटला

‘एक देश, एक निवडणूक’ देशातील राज्यांवर हल्ला : राहुल गांधी

 

Back to top button