पुण्याच्या मंडळींचे नियमावर बोट! तलावांत कुकडीचे पाणी सोडण्यास विरोध | पुढारी

पुण्याच्या मंडळींचे नियमावर बोट! तलावांत कुकडीचे पाणी सोडण्यास विरोध

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा(अहमदनगर) : सध्या सुरू असलेल्या कुकडीच्या श्रीगोंदा तालुक्यातील महत्त्वाच्या तलावात पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील मंडळींनी नियमावर बोट ठेवत श्रीगोंदा तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यास विरोध दर्शविला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच विसापूरसह अन्य तलावांत पाणी सोडण्यास टाळाटाळ होत आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने कापूस, मका, तूर, बाजरी, कांदा, ऊस यासह फळबागा धोक्यात आल्या होत्या.

पण, कुकडीचे आवर्तन वेळेवर सोडण्यात आल्याने ही पिके वाचली आहेत. जवळपास सर्व वितरिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने पिके तरली. आता विसापूरसह इतर छोट्या-मोठ्या तलावात पाणी सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विसापूरमध्ये पाणी सोडण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बेलवंडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलनही झाले. नेतेमंडळीसह त्या भागातील शेतकर्‍यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, तेथे उपस्थित असणार्‍या जलसंपदा खात्याच्या अधिकार्‍यांनी ठोस ग्वाही न देता वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

आता विसापूरसह अन्य तलावांत पाणी सोडण्यास टाळाटाळ का होत आहे, याची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील 65 बंधार्‍यांना पाणी सोडता येणार नाही, असा आदेश मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ( लवाद) राज्य शासनाला दिला आहे. सिंचनासाठी 65 बंधार्‍यावरील लाभक्षेत्राला दुहेरी स्त्रोतांचा लाभ घेता येणार नाही, असेही या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

याच मुद्द्यावर बोट ठेवत पुणे जिल्ह्यातील काही राजकीय मंडळीनी श्रीगोंदा तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. अर्थात ही मंडळी सत्तेत असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे. दुसरीकडे विसापूर खालच्या शेतकर्‍यांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाणी न मिळाल्यास त्या भागातील पिण्याच्या पाण्यासह पिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

पुणे-नगर यांच्यातील संघर्ष कायम

कुकडीच्या पाण्यावरून पुणे-नगर जिल्ह्यात अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. आता लवादाच्या निर्णयानंतर त्यात अधिक भर पडली आहे. हा संघर्ष संपविण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

जलसमाधी आंदोलन करणार

विसापूर खालच्या भागात शेतीसह पिण्यासाठी पाणी मिळावे, ही आमची मागणी आहे. वारंवार मागणी करूनही शासन डोळेझाक करत असून, आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आम्ही कुकडी कालव्यात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

अजित पवार यांची भेट घेणार

श्रीगोंदा तालुक्यातील तलावामध्ये पाणी सोडण्यास पुणे जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध आहे. तलावामध्ये पाणी न सोडल्यास या भागातील शेती अन् पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. विसापूरला पाणी सोडण्यासाठी तालुक्यातील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

तातडीने पाणी सोडणे गरजेचे

कालवा सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद दरेकर म्हणाले, तालुक्यातील विसापूर, मोहरवाडी, घोडेगाव, भावडी, औटेवाडी तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. या तलावावर पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. ते पाणी तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा

मासळी स्वस्त; चिकन, अंडी महागली

राज्यात डोळ्यांची साथ सुरूच; ५ लाख रुग्णांचा टप्पा पार

अहमदनगर जिल्ह्यात जीईएम पोर्टलवरील खरेदीला ग्रामपंचायतींकडून हरताळ!

Back to top button