Kolhapur : खिद्रापूर कोपेश्वरात महाआरतीने श्रावणीचा प्रारंभ | पुढारी

Kolhapur : खिद्रापूर कोपेश्वरात महाआरतीने श्रावणीचा प्रारंभ

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : खिद्रापूर (ता.शिरोळ) येथे श्रावणी सोमवारला प्रारंभ झाला. येथील कल्लेश्वर मंदिर, कृष्णा घाट शुभ्रमणेश्वर मंदिर, विष्णू महादेव मंदिर, पारकट्टा महादेव मंदिरात श्रावण मासारंभाच्या पार्श्वभूमीवर पहाटे काकड आरती करून महापूजा करण्यात आली. पहाटेपासून दिवसभर भक्तांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे. (Kolhapur)

Kolhapur : दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी

खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथे पुजारी रमेश जोशी यांच्या हस्ते तर गजानन जोशी यांच्या मंत्रविधीने कोपेश्वर आणि धोपेश्वराला दुग्धभिषेक, जलाभिषेक, फुलाभिषेक आणि बेलाचे पान वाहून दुपारी साडे बारा वाजता महाआरती करण्यात आली. श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्याने रविवारी (दि.२०) रात्रीपासून सांगली-मिरज व कोल्हापूर जिल्ह्यातून तर कर्नाटक राज्यातून काही लोक वाहनाने तर, काही लोक पायी चालत येऊन दर्शन घेत होते. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दुग्धाभिषेक जलाभिषेक फुलाभिषेक वाहून तांदळाची शिवमूठही वाहत आहेत. पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने भाविकांच्यासाठी सोयीसुविधा व सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

खिद्रापूर कोपेश्वरात येथील कोपेश्वर धोपेश्वराचे महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यासह भागातील भाविकांनी घेतले दर्शन

कुरुंदवाड येथील शुभ्रमणेश्वर मंदिरात पुजारी जयवंत हुद्दार, गिरीश हुद्दार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक,रुद्राभिषेक,जलाभिषेक व फुलाभिषेक घालून महापूजा करण्यात आली. तर कल्लेश्वर मंदिरात मंदिराचे पुजारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालून महापूजा करण्यात आली. यावेळी भक्तांनी बेलाचे पान, तांदूळ व फुले वाहून पूजा केली. वाद्याचे मानकरी राजीव आवळे यांनी आपल्या हलगीचा ताल देऊन कल्लेश्वर मंदिरात नागपंचमीला सुरुवात केली. यावेळी दुडया स्वामी, मल्लाप्पा जंगम, नितीश आंबी, मुन्ना फल्ले, अमर कबाडे, प्रवीण खबाले, गणेश आलासे, कृष्णात आंबी, महादेव काका आंबी, सह आदी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button