लवंगी मिरची : आला श्रावण..!

लवंगी मिरची : आला श्रावण..!
Published on
Updated on

ये मित्रा, श्रावणाबरोबरच तुझे आजचे आगमन अत्यंत आनंददायी आहे. 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे!'
काय म्हणतोस मित्रा? आज चांगल्या मूडमध्ये दिसत आहेस. वातावरण तर झकास आहे; पण यावर्षी पाऊस म्हणावा तसा पडला नाही. मराठवाड्यातील धरणे अजून कोरडीच आहेत; पण थोड्याशा पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे आणि सर्वत्र हिरवागार गालिचा पांघरलेला दिसत आहे.

मला त्या गोष्टीमुळे फारसा आनंद होत नाही. मला खरा आनंद होतो तो श्रावणामध्ये मांसाहार करणारे बरेचसे लोक श्रावण पाळतात. त्यामुळे असंख्य कोंबड्यांना या काळामध्ये जीवदान मिळत असते. तीच परिस्थिती बकर्‍यांची पण असते. त्यामुळे श्रावण आला की, कोंबड्या आणि बकर्‍यांमध्ये चैतन्य दिसून येते, नाही का?

बरोबर आहे तू म्हणतोस ते! आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मार्केटला खाली-वर करण्याची ताकद आहे. म्हणजे बघ, श्रावण सुरू होताच कांद्याचे भाव पडलेले असतात. कारण, बरेचसे लोक या महिन्यात लसूण-कांदा खात नाहीत. श्रावण हा कांद्याच्या व्यापार्‍यांवर आणि कांदा उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय करत असतो. म्हणजे एकच ऋतू कोंबड्या आणि बकर्‍यांसाठी वरदान आणि तोच ऋतू कांदा उत्पादन करणारांसाठी शाप हीच तर खरी भारतीय संस्कृतीची गंमत आहे.

श्रावणामध्ये महिलावर्ग सर्वात जास्त बिझी असतो. बहुतांश महत्त्वाचे सण या काळामध्ये येतात. शिवाय, श्रावणी सोमवारच्या दिवसांचे उपवास यामुळे शेंगदाणा, साबुदाणा या उपवासाच्या पदार्थांना भरपूर भाव मिळतो. बरेच लोक अभक्षभक्षण आणि निषिद्ध असणार्‍या द्रवापासून या काळात दूर राहतात. श्रावण सुरू झाला की, मद्यनिर्मिती करणार्‍या कंपन्यांचे कळकळीचे मेसेज यायला सुरुवात होते. त्यांचे म्हणणे असते की, कुत्रा पाळा, मांजर पाळा, शेळी पाळा, घोडा पाळा; पण फक्त श्रावण पाळू नका, प्लीज! कारण की, श्रावण पाळायला फार मोठ्या जनसंख्येने सुरुवात केली, तर यांच्या रोज निर्माण होणार्‍या उत्पादनांचे काय करायचे, हा प्रश्न त्यांना भेडसावत असतो.

होय, नक्कीच! या काळामध्ये मांसाहार देणारे हॉटेल्स थंडगार पडलेली असतात. म्हणजे तिथे पण महिनाभर मंदी असते आणि आपण म्हणालो तसे आपल्या संस्कृतीचा परिणाम बाजारपेठेवर पण होत असतो, हे यातून दिसून येते.

ते काही असो; पण नेहमीप्रमाणे राज्यातले राजकारण मात्र बहरत आहे. दोन मोठे पक्ष फुटल्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते सभा आणि रॅलीज यांच्यासहित झंजावाती दौरे करत आहेत. मोठ्या नेत्याने एखाद्या जिल्ह्यामध्ये सभा घेऊन आपले कार्यकर्ते ओढण्याचा प्रयत्न केला की, पाठोपाठ त्याच गावामध्ये फुटलेले नेते सभा घेतात आणि आपले कार्यकर्ते फुटणार नाहीत, याची काळजी घेत असतात. आपापला गट मजबूत करण्यासाठी राज्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष आपले प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न करून या बहारदार श्रावणामध्ये जनतेच्या दारी हजर होत आहेत. राजकारणात अशी गंमत आणि पर्यटनात असणारी झुंबड याची पर्वणी महाराष्ट्राला या काळात मिळणार आहे. आपल्याला काय करायचे? आपण आपले महादेवाला वंदन करून या देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करूया! कारण, आपल्या हातात तेवढेच आहे. हे शंभू महादेवा, राजकारणाचे काय व्हायचे ते होऊ दे! पण, राज्याच्या प्रगतीची चाके गतिमान होऊ दे, एवढीच प्रार्थना!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news