पहिला श्रावण सोमवार : परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई; जय्यत तयारी | पुढारी

पहिला श्रावण सोमवार : परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई; जय्यत तयारी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. पूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसराला पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे. मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टचे 100 हून अधिक सी. सी. टी. व्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काळजी घेताना दिसत आहे.

देशाच्या कानकोपऱ्यातून भाविक श्री वैद्यानाथाच्या दर्शनासाठी परळीत येत असतात. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तयारी पूर्ण केलेली आहे. मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे. अधिक मासानंतर येत असलेल्या नीज श्रावणामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट गुरुवार रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झाल. पहिला श्रावण सोमवार उद्या 21 ऑगस्ट रोजी असुन आज 20 ऑगस्ट रविवारी रात्री 12 वाजल्यापासुनच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे. मंदिर परिसरात देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि स्वछता कर्मचारी असणार आहेत.

भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून धर्म दर्शनाची महिला-पुरुष असे प्रत्येकी वेगळी रांग असणार आहे. तर पासची स्वतंत्र रांग करण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची झडती घेऊनच आतमध्ये सोडण्यात येणार आहे. यामध्ये तिन्ही रांगांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या देखरेखेखाली मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहपोलीस निरक्षक, पोलीस उप निरीक्षक, महिला, पुरुष कर्मचारी, होमगार्ड असा अंदाजे 150 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

Back to top button