पुणे : उद्योजकाच्या बंगल्यातून 38 लाखांचा ऐवज चोरीस | पुढारी

पुणे : उद्योजकाच्या बंगल्यातून 38 लाखांचा ऐवज चोरीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  औंध परिसरातील एका उद्योजकाच्या बंगल्यातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा 38 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्र्यंबकराव पाटील (वय 75, रा. सांगवी रोड, औंध) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 15 जून ते 17 ऑगस्ट या कालावधीत घडली.

फिर्यादी यांची खतनिर्मितीची कंपनी असून, ते कंपनीच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालकपदावरून निवृत्त झाले आहेत. पत्नी आणि ते असे दोघे सांगवी रोड-औंध येथील कोहिनूर प्लॅनेट येथे राहतात. 17 ऑगस्टला त्यांच्या पत्नीला मूळ गावी धुळे येथे जायचे होते. त्यामुळे त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दागिने पाहिले असता मिळून आले नाहीत तसेच रोकडदेखील नव्हती. त्यांनी याबाबत मुलाला माहिती देऊन घरी बोलावून घेतले. त्यांनी शोधाशोध केली; मात्र ऐवज सापडला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या वेळी घरातून चोरट्याने सोन्याची बिस्किटे, सोन्याच्या पाटल्या, अंगठ्या, गंठण, नेकलेस, मोहनमाळ आणि अकरा लाखांची रोकड चोरी केल्याचे समोर आले. दरम्यान, गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

HBD Randeep Hooda : गाड्या धुतल्या, रेस्टॉरंटमध्ये काम केलं, रणदीपने कसं मिळवलं इतकं यश

Rain Update : राज्यात विदर्भात मुसळधार; अन्यत्र मध्यम पाऊस होणार

Back to top button