अमेरिकेने २१ भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवले, कायदेशीर कारवाईचा इशारा | पुढारी

अमेरिकेने २१ भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवले, कायदेशीर कारवाईचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेने एकाच दिवसात २१ भारतीय विद्यार्थ्यांना माघारी पाठवले. यामागे व्हिसातील त्रुटी आणि कागदपत्रांची पूर्तता न होणे हे कारण असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांची सर्व कागदपत्रे पूर्ण होती आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ते अमेरिकेला जात होते. ही घटना १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान घडली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विद्यार्थी आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील आहेत. त्यांनी व्हिसाची औपचारिकता पूर्ण केली होती परंतु अटलांटा, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को विमानतळांवर त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच कागदपत्रांच्या तपासणीला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचे कारण देण्यात आले नाही. अमेरिकन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते अमेरिकेला जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांचे फोन आणि अगदी व्हॉट्सअॅप चॅट देखील स्कॅन करण्यात आले.

कायदेशीर कारवाईचा इशारा दिला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांनी शांतपणे त्यांच्या मायदेशी परत जाण्यास सांगितले आणि आक्षेप घेतल्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. यापैकी काही विद्यार्थ्यांनी मिसूरी आणि डकोटा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता. एका वेबसाइटने सांगितले की, तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही संपर्क यंत्रणेशिवाय बंदिस्त जागेत ठेवण्यात आले होते. पुढील पाच वर्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशावर बंदी घालण्यात येईल. या मुद्द्यावर अमेरिका किंवा भारत सरकारकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

हेही वाचा : 

Back to top button