Chinese rover : चिनी रोव्हरने बनवला चंद्राच्या 1 हजार फूट खोल स्तराचा नकाशा | पुढारी

Chinese rover : चिनी रोव्हरने बनवला चंद्राच्या 1 हजार फूट खोल स्तराचा नकाशा

बीजिंग : चीनचे ‘चेंगी-4’ हे अंतराळयान 2018 मध्ये चंद्राच्या आजपर्यंत अज्ञात राहिलेल्या, अंधार्‍या बाजूवर उतरले. अशा ठिकाणी उतरणारे हे पहिलेच यान ठरले होते. या यानाने तेथील विवरांचे निरीक्षण केले आणि उत्खनन करून चंद्राच्या मँटलमधील खनिजांचे नमुने गोळा केले. इतकेच नव्हे तर चंद्राच्या या बाजूमधील पृष्ठभागापासून एक हजार फूट खोल असलेल्या स्तराचा नकाशाही या यानाच्या रोव्हरने बनवला आहे. त्यामुळे आतापर्यंत अज्ञात राहिलेला चंद्राचा अब्जावधी वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडण्यास मदत मिळणार आहे.

‘चेंगी-4’मधील या रोव्हरचे नाव ‘युतु-2’ असे आहे. त्यामध्ये ‘लुनार पेनिट्रेटिंग रडार’ (एलआरआर) हे नवे तंत्रज्ञान समाविष्ट आहे. त्याच्या सहाय्याने हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागात खोलवर रेडियो सिग्नल्स पाठवू शकते. अ‍ॅरिझोनामधील टुस्कान येथील प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटमधील संशोधक जियानकिंग फेंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

या रेडिओ लहरी जमिनीखालील स्तरातून परत येतात व चंद्राच्या पृष्ठभागाखालील स्तरांचा नकाशा तयार करतात. 2020 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागाखाली 130 फुटांपर्यंत या रेडियो लहरी पाठवण्यात आल्या होत्या. आता तब्बल एक हजार फूट खोलीपर्यंत त्या पाठवून चंद्राच्या पोटात काय लपलंय याचा अंदाज घेण्यात आला! याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ जियोफिजिकल रिसर्च ः प्लॅनेटस्’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button