Global Water Scarcity: जगातील एकचतुर्थांश लोकसंख्येपुढे पाणी टंचाईचे संकट..! अहवालातून गंभीर निरीक्षणे समोर | पुढारी

Global Water Scarcity: जगातील एकचतुर्थांश लोकसंख्येपुढे पाणी टंचाईचे संकट..! अहवालातून गंभीर निरीक्षणे समोर

प्रवीण ढोणे

राशिवडे: पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, बेसुमार होणारी झाडांची कत्तल आणि वाढत्या प्रदुषणामुळे निसर्गाचा लहरीपणा (Global Water Scarcity)  वाढला आहे. अवेळी पडणारा पाऊस, ऊन आणि गायब होत चाललेला हिवाळा यामुळे वातावरणही चलबिचल झाले आहे. या सगळ्या बाबींचा गंभीर परिणाम निसर्गचक्रावर होत चालला आहे. पाण्याची वाढती मागणी आणि निसर्गचक्राचा बदललेला फेरा यामुळे आगामी काळात जगाला जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची भिती निर्माण झाली आहे. सध्या जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यानंतरची स्थिती तर विचारापलीकडची असेलही भिती व्यक्त होत आहे.

वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटने (डब्ल्यूआरआय) ‘अक्वेडक्ट वॉटर रिस्क ॲटलास’ (एडब्ल्यूआरए) या अहवालामध्ये भविष्यात म्हणजेच येत्या पंचवीस वर्षामध्ये जगावर पाण्याचे मोठे संकट ओढवले जाण्याची भिती व्यक्त केली आहे. आधीच पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदलाचे वेगाने ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २०५० पर्यंत एक अब्ज लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त केली आहे. दर चार वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. (Global Water Scarcity)

पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे बहुतेक देश त्यांच्याकडील असलेल्या जलस्त्रोतांमधील सर्व पाण्याचा वापर करीत आहेत. त्यांच्या अपारंपरिक पुरवठ्याच्या ८० टक्के पाणी वापरले जाते. जगातील २५ टक्के नागरिक ज्या २५ देशांमध्ये राहत आहेत, त्‍यांना दरवर्षी पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये बहरीन, सायप्रस, कुवेत, लेबनॉन आणि ओमान या देशांमध्ये अत्यंत गंभीर स्थिती आहे. अल्प काळ पडणाऱ्या दुष्काळामुळेही या देशांमध्ये जलस्रोत आटण्याचा धोका आहे.

सहारा वगळून समावेश होणाऱ्या आफ्रिकी देशांमध्ये (उप-सहारा प्रदेश) पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. ही वाढ पुढील २७ वर्षांत तब्बल १६३ टक्के असेल. अहवालातील नोंदीनुसार अमेरिकेतील सहा राज्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. कोलोरॅडो नदीच्या खोऱ्यातील ॲरिझोना, न्यू मेक्सिको हे देश पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पहिल्या देशांपैकी आहेत. पाणी टंचाईमुळे जीवन कष्टमय बनते. अन्नसुरक्षेला धोका पोहचू शकतो आणि विजेचेही संकट निर्माण होते.

Global Water Scarcity : २०५० पर्यंत पाण्याची मागणी 20 ते २५ टक्क्यांनी वाढणार….

जगात १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. २०५० पर्यंत त्यात आणखी २० ते २५ टक्के वाढ होण्याचे भाकित अहवालात व्यक्त केले आहे. वाढती लोकसंख्या, शेती, उद्योगांची गरज यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अशाश्‍वत पाण्याच्या वापराचे धोरण आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचा अभाव ही कारणेही आहेत. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिका हे जगातील सर्वाधिक पाणी टंचाई जाणवणारे प्रदेश आहेत. तेथील लोकांना या शतकाच्या मध्यापर्यंत पाण्याच्या भीषण टंचाईच्या छायेतच जगावे लागेल. पिण्याच्या पाण्याचा अभाव, औद्योगिक क्षेत्रांचे नुकसान यामुळे होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे बिघडत चाललेले नियोजन, झाडांची कत्तल, वाढते औद्योगिकीकरण, वाढते प्रदूषण आदी हानीकारक बाबींचा आताच गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

हेही वाचा 

Back to top button