भारतीय संघात दोन गट; एक विराट कोहली सोबत तर दुसरा विरोधात | पुढारी

भारतीय संघात दोन गट; एक विराट कोहली सोबत तर दुसरा विरोधात

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

टी२० वर्ल्ड कप मधील भारतीय संघाने कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली केलेल्या खराब कामगिरीनंतर चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंड यांच्या कडून पराभव स्विकारल्यानंतर आता भारतीय संघाची या वर्ल्ड कप मधील वाटचाल जवळ जवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाला टिकेला सामोरे जावे लागत आहे.

क्रिकेट तज्ज्ञ व समालोचक भारताच्या पराभवाची विविध कारणे सांगत आहेत. भारतीय संघ सतत विविध ठिकाणी खेळत असणारे सामने, बायो बबल मध्ये होणारी थकावट तेथील पाळावे लागणारे नियम, वर्ल्ड कपच्या आधी खेळली गेलेली आयपीएल सारखी स्पर्धा, वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेला चुकीचा संघ अशी एक ना अनेक कारणे दिली जात आहेत.

या सर्व कारणांमध्ये तथ्य आहेतच पण, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने वेगळ्याच कारणाकडे लक्ष वेधले आहे. शोएब अख्तरच्या मते भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. संपूर्ण टीम एकसंघ नाही. संघामध्ये सरळ सरळ उभी फुट पडली आहे. या मुळेच भारतीय संघाच्या खेळात सामंजस्याचा अभाव जाणवत होता. याचा परिणाम होऊन भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

शोएब अख्तर पुढे म्हणतो की, भारतीय संघात दोन गट पडले आहेत. एक गट कर्णधार विराट कोहली याच्या पाठीमागे आहे. तर दुसरा गट त्याच्या विरोधात आहे. अशा पद्धतीच्या विभाजनामुळे मैदानात एकजुटता दिसून आली नाही.

मला भारतीय संघ विभागला गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मला माहित नाही हे का होत आहे. पण, कर्णधार म्हणून विराट कोहली याचा हा शेवटचा टी२० वर्ल्ड कप आहे. त्यामुळे देखिल असे झाले असेल. कदाचित त्याने चुकीचे निर्णय घेतले असतील. पण, तो एक महान क्रिकेटर आहे आणि त्याला त्याचा मान दिला गेला पाहिजे असे देखिल शोएब अख्तर म्हणाला.

भारतीय संघाला मोठ्या टिकेचा सामना करावा लागत आहे. माजी कर्णधार कपिल देव हे देखिल विराट कोहली याच्या वक्तव्यावर नाराज असल्याचे दिसून आले आहे. विराट कोहली म्हणाला की, संघाने मैदानामध्ये धाडस दाखवले नाही. म्हणून कपिल देव विराटवर नाराज झाले. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारताने फलंदाजीच्या क्रमात केलेल्या बदलावरुन देखिल संघ व्यवस्थापनावर टिका होत आहे.

शोएब अख्तर याला वाटते की ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळला आहे त्याची समिक्षा होणे गरजेचे आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची देहबोली अत्यंत वाईट होती. संघाचा दृष्टीकोण खूपच खराब होता. नाणेफेक हरलो म्हणून काय झाले? पण नाणेफेक हरल्यानंतर प्रत्येकाने आधीच पराभव स्विकारला होता.

सेमी फायनल मध्ये भारतीय संघ पोहचणे जवळपास दुरापास्त आहे. यासाठी भारतीय संघाला उर्वरीत सर्व सामने मोठ्या फरकारने जिंकणे आवश्यक आहे. तसेच अशी आशा ठेवली पाहिजे की अफगानिस्तान न्यूझीलंडला पराभूत करेल. पण, या सर्व गोष्टी जर तर च्या आणि चमत्कार घडविण्यासारखे आहेत. पण भारतीय संघाने या पराभवाची समिक्षा तर केलीच पाहिजे पण, संघात जर वाद आणि दुफळी असेल तर ती नष्ट करुन लवकरात लवकर एकजूट होऊन नव्या आव्हानांसाठी सज्ज झाले पाहिजे.

Back to top button