RSA vs BAN : आफ्रिकेने बांगलादेशचा धुरळा उडवत साजरा केला तिसरा विजय | पुढारी

RSA vs BAN : आफ्रिकेने बांगलादेशचा धुरळा उडवत साजरा केला तिसरा विजय

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन

RSA vs BAN : दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा सहा विकेट्स राखून पराभव करत आपला सलग तिसरा विजय साजरा केला. याचबरोबर त्यांनी आपली सेमी फायनलमधील दावेदारी प्रबळ केली. रबाडा आणि नॉर्खियाच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण डाव ६४ धावात गुंडाळला गेला. त्यानंतर बांगलादेशनेही आफ्रिकेला पॉवर प्लेमध्ये धक्के दिले. मात्र कर्णधार टेंबा बाऊमा आणि डुसेननने आफ्रिकेचा विजय निश्चित केला.

८५ धावांचे माफक आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशनेही पॉवर प्लेमध्ये धक्क्यावर धक्के दिले. टस्किन अहमदने पहिल्याच षटकात सलामीवीर रिझा हेंड्रिक्सला ४ धावांवर बाद केले. त्यानंतर डिकॉक आणि डसेन यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र मेहंदी हसनने डिकॉकचा १६ धावांवर त्रिफळा उडवत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. पॉवर प्ले संपत आला असतानाच टस्किन अहमदने पुन्हा एकदा आफ्रिकेला धक्का दिला. त्याने एडिन मार्करमला शुन्यावर बाद करत आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३३ अशी केली.

त्यानंतर मात्र डुसेन आणि कर्णधार टेंबा बाऊमा यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली. मात्र विजयासाठी फक्त ५ धावांची गरज असताना डसेन २२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार टेंबा बाऊमाने आणि डेव्हिड मिलरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. बाऊमाने नाबाद ३१ धावा केल्या तर मिलन ५ धावांवर नाबाद रागिला. बांगलादेशकडून टस्किन अहमदने दोन बळी टिपले.

हेही वाचा : ‘जसप्रीत बुमराह प्रेस कॉन्फरन्स का करतोय? शास्त्रींनी पुढे यायला हवे’

RSA vs BAN : रबाडाने बांगलादेशला लावला सुरुंग 

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने बांगलादेशी फलंदाजीचे कंबरडेच मोडले. आफ्रिकेने बांगलादेशला ८४ धावात गुंडाळले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कसिगो रबाडाने पॉवर प्लेमध्येच बांगलादेशला पाठोपाठ तीन धक्के दिले. त्यानंतर तबरेज शाम्सीने २ तर नॉर्खियाने ८ धावात ३ विकेट घेत संपूर्ण बांगालादेश संघाला शंभरच्या आत पॅव्हेलियनमध्ये धाडले.

रबाडाने चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मोहम्मद नैमला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सौम्या सरकारला भोपळाही न फोडू देता पॅव्हेलियनची वाट धरायला लावली. त्यानंतर मुशफिकूर रहीमलाही सहाव्या षटकात शुन्यावर बाद केले.

RSA vs BAN : शाम्सी, नॉर्खियानेही लावला हातभार

रबाडा पाठोपाठ नॉर्खियाने बांगलादेशचा कर्णधार मोहमदुल्लाला ( ३ ) स्वस्तात माघारी धाडत बांगलादेशची वरची फळी भेदली. दरम्यान, सलामीला आलेल्या लिटन दासने एक बाजू लावून धरली होती. पण, दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याचा सिलसिला सुरुच राहिला. आता प्रिटोरियसने अफिफ हुसैनला शुन्यावर बाद करत बांगलादेशला पाचवा धक्का दिला. त्यानंतर लिटन दासची २४ धावांची खेळी तबरेज शम्सीने संपवली.

हेही वाचा : T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

शम्सीने बांगलादेशला अजून एक धक्का देत शमिम हुसैनला ११ धावांवर बाद केले. त्यामुळे बांगलादेशची अवस्था १५ षटकात ७ बाद ६४ धावा अशी झाली. दरम्यान, टस्किन अहमदही ३ धावांवर धावबाद झाला. १९ व्या षटकात नॉर्खियाने २७ धावांची खेळी करणाऱ्या मेहंदी हसनला बाद करत बांगलादेशला शंभरच्या आत गुंडाळण्याची तयारी सुरु केली. त्याने पुढच्याच चेेंडूवर नासुम अहमदचा शुन्यावर त्रिफळा उडवत बांगलादेशचा डाव ८४ धावात संपवला.

Back to top button