'जसप्रीत बुमराह प्रेस कॉन्फरन्स का करतोय? शास्त्रींनी पुढे यायला हवे' - पुढारी

'जसप्रीत बुमराह प्रेस कॉन्फरन्स का करतोय? शास्त्रींनी पुढे यायला हवे'

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताने न्यूझीलंड विरुद्धचा सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर टीकेची झोड उठत आहे. या पराभवानंतर भारताचे टी २० वर्ल्डकपमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पराभवानंतर जसप्रीत बुमराह पत्रकारांना सामोरा गेला. त्यावेळी त्याने बायो बबलचा ताण, आयपीएलमधील थकवा यामुळे संघाचा लौकिकास साजेसा खेळ झाला नाही असे विधान केले. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी संघ व्यवस्थापनाने पराभवानंतर जसप्रीत बुमराहला प्रेस कॉन्फरन्ससाठी पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली.

मोहम्मद अझरुद्दीन एका वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले की, ‘माझ्या मते प्रेस कॉन्फरन्सला प्रशिक्षकांनी यायला हवे होते. जर विराट कोहली प्रेस कॉन्फरन्स करु इच्छित नाही तर ठीक आहे. पण, रवी भाईंनी ( शास्त्री ) प्रेस कॉन्फरन्स करायला हवी होती.

ते पुढे म्हणाले की, ‘तुम्ही फक्त विजयानंतर प्रेस कॉन्फरन्स करु शकत नाही. तुम्ही पराभवाचेही स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. जसप्रीत बुमराहला प्रेस कॉन्फरन्सला पाठवणे योग्य नव्हते. कर्णधार किंवा प्रशिक्षकांमधील कोणीतरी या दोघांपैकी एकाने प्रेसला सामोरे जाणे गरजेचे होते.’

हेही वाचा : T20 World Cup : भारत सेमीफायनलमध्ये कसा पोहोचू शकतो?

ज्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन यांना शास्त्री किंवा विराटला वाईट कामगिरीनंतर प्रश्नांना सामोरे जायचे नव्हते का असे विचारले असता त्यांनी तुम्हाला पराभवाची लाज वाटली नाही पाहिजे असे सांगितले.

ते म्हणाले की ‘जर तुम्ही एक किंवा दोन सामने गमावले तर त्याच लाज वाटून घेण्यासारखे काही नाही. पण, कर्णधार किंवा प्रशिक्षकांनी देशाला संघ का हरला याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. या प्रश्नांची उत्तरे जसप्रीत बुमराह कसा देऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही संघ जिंकतो त्यावेळी माध्यमांसमोर जाता तर संघ कठिण परिस्थितीतून जात असताना तुम्ही पुढे आले पाहिजे.’

Back to top button