पुणे : वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण | पुढारी

पुणे : वालचंदनगर कंपनीच्या कामगारांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीच्या कामगारांनी थकीत पगार व इतर थकीत देण्यांच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी मुक मोर्चा काढून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे.

याबाबत आय.एम.डी. कामगार समन्वय संघटनेचे अध्यक्ष कपिल गायकवाड म्हणाले, गेल्या १३ महिन्यांपासून कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढ करार लांबणीवर टाकला आहे. कामगारांचे फेब्रुवारी, मार्च व एप्रिल २०२३ मधील वेतन अद्याप दिलेले नाही.

एप्रिल २०२१ पासून जून २०२३ मधील अतिरिक्त कामाचे (ओव्हर टाईम) वेतन दिले नाही. २०२० पासूनची मेडिकल बिले रखडवली आहेत. चालू वर्षातील तीन महिन्यांचे इन्सेन्टीव बिले दिली नाहीत. त्यामुळे कामगारांची सुमारे सात कोटींची देणी थकली आहेत.

याबाबत कंपनी व्यवस्थापन वेळकाढूपणा करत असून कामगारांवर आर्थिक संकट आले आहे. कंपनी गेल्या वर्षभरापासून नफ्यात असून केवळ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना वेळोवेळी पगारवाढ केली जात आहे. याउलट कष्ट करणाऱ्या कामगारांना जाणीवपूर्वक दुर्लक्षीत केले जात असल्याचा त्यांनी आरोप केला असून तातडीने कामगारांची देणी देण्याची मागणी केली. अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात कंपनीचे जवळपास ६०० कामगार उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सेक्रेटरी शहाजी दबडे, खजिनदार राजकुमार गोरे यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते. या आंदोलनास परिसरातील अनेक सामाजिक संस्था व कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा;

Back to top button