खडकवासला : मोकाट कुत्र्यांची दहशत; तब्बल सहा शेळ्यांचा फडशा | पुढारी

खडकवासला : मोकाट कुत्र्यांची दहशत; तब्बल सहा शेळ्यांचा फडशा

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पानशेत परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जनावरे वाचवायची कशी? याची चिंता स्थानिकांना आहे. आंबी येथे योगेश नारायण निवंगुणे यांच्या गोठ्यातील सहा शेळ्यांचा कुत्र्यांनी फडशा पाडला. या आधीही मोकाट कुत्र्यांनी दत्तात्रय रामभाऊ निवंगुणे यांच्या गोठ्यातील दोन वासरे व 16 शेळ्यांचा फडशा पाडला होता. मोकाट कुत्र्यांमुळे शेतकर्‍यांसह नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे.

शनिवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आठ-दहा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने योगेश निवंगुणे यांच्या गोठ्यात शिरून त्यातील सहा शेळ्यांचा फडशा पाडला. स्थानिक रहिवासी संजय निवंगुणे म्हणाले, ‘गोठ्यात शिरून मोकाट कुत्री जनावरांवर हल्ला करत आहेत. हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता ही कुत्री जागची हलत नाहीत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे म्हणाले, ‘या मोकाट कुत्र्यांमुळे नैसर्गिक आपत्तीपेक्षाही मोठी आपत्ती आंबी, पानशेत भागावर कोसळली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची यंत्रणा नाही,
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.’

हल्ल्यापासून जनावरे वाचविण्याचे आव्हान

पानशेत-वरसगाव धरण परिसरासह आंबी, रुळे, सोनापूर भागात गेल्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सुरू आहे. मुख्यत: पुणे-पानशेत रस्त्यावर मोकाट कुत्री ठाण मांडून बसत आहेत. रात्रीच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात शिरून शेळ्या-मेंढ्या, वासरे अशा जनावरांवर हल्ला करून त्यांचा जागीच फडशा पाडत आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांसमोर शेळ्या, मेंढ्या व वासरे जगविण्याचे
मोठे आव्हान उभे आहे.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. ग्रामपंचायतीने वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत प्रस्ताव द्यावा.

डॉ. वामन डबेटवार, पशुधन विकास अधिकारी,
हवेली तालुका पंचायत समिती

या समस्येसाठी ग्रामपंचायतीकडे अशी यंत्रणा नाही. अचानक रात्री अपरात्री मोकाट कुत्री जनावरांवर हल्ले करतात. यातून गोरगरीब शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. जनावरे पाळणे धोकादायक झाले आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर या भागातील शेळीपालन व्यवसाय बंद होण्याची भीती आहे.

मंगल निवंगुणे, सरपंच, आंबी

हेही वाचा

शिर्डी : सुट्ट्यांमुळे साईनगरीत भाविकांचा महापूर

नगर : ग्रामपंचायत सदस्याचे घर पेटविले

नागपूर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Back to top button