नोकरीच्या आमिषाने फसलेले सांगली, सोलापूरमधील; तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेविरोधात पुरावे | पुढारी

नोकरीच्या आमिषाने फसलेले सांगली, सोलापूरमधील; तत्कालीन आयुक्त शैलजा दराडेविरोधात पुरावे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे व तिचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याकडून नोकरीच्या आमिषाने फसवणूक झालेले 44 डी.एड्., बी.एड्. उमेदवार सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आहेत. त्यांची संख्या चव्वेचाळीसहून अधिक आहे. यंत्रणेने कसून तपास करावा. फसवणुकीचे रॅकेट उघड करावे. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादी पोपट सूर्यवंशी (आटपाडी) यांनी केली.

शैलजा हिचा भाऊ दादासाहेब इंदापूरमध्ये प्राथमिक शिक्षक होता. शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्याने शिक्षकांशी ओळख वाढवली. बहीण शैलजाच्या माध्यमातून नोकरी लावण्याचे आमिष दादासाहेबकडून दिले जात होते. खात्री करण्यासाठी काही उमेदवारांचे नातेवाईक दादासाहेब याच्यासह पुणे येथील कार्यालयात शैलजा यांना त्यांच्या केबिनमध्ये भेटले. नोकरी लावली जाईल, माझे नाव कोणालाही सांगायचे नाही, असे शैलजा यांनी उमेदवारांच्या नातेवाईकांना सांगितले. खात्री पटताच शिक्षकपदाच्या नोकरीसाठी नातेवाईक दोन उमेदवारांतर्फे 27 लाख रुपये दादासाहेबकडे दिले. डी.एड. शिक्षक नोकरीसाठी 12 लाख व बी.एड. शिक्षक नोकरीसाठी 15 लाख रुपये असा दर होता. पुण्यातील हडपसर येथे जुलै 2019 मध्ये 27 लाखांची रोख रक्कम दराडे याने घेतली, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
सूर्यवंशी म्हणाले, खासगी शिक्षण संस्थेत नोकरी लागणार, अशी आशा उमेदवार आणि नातेवाईकांना होती. मात्र तीन महिने झाले तरी नोकरीच्या काहीच हालचाली दिसेनात, उलट दराडेकडून वेगळीच भाषा येऊ लागली. फसवणूक झाल्याचे दिसून येताच पुरावे तयार करण्यास सुरुवात केली.

शैलजा, दादासाहेब यांची भेट घेऊन संभाषण केले. त्याचे ऑडिओ, व्हिडीओ रेकार्डिंग केले. हा महत्वाचा पुरावा सादर करूनही गुन्हा दाखल करून घेण्यास हडपसर (पुणे) पोलिसांकडून टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर गुन्हा दाखल करून घेतला. दादासाहेबला 4 एप्रिलरोजी अटक झाली, पण शैलजा दराडे अटकपूर्व जामिनावर होती. तिच्या अटकेसाठीही न्यायालयीन लढा लढावा लागला. अखेर 7 ऑगस्टरोजी तिला अटक झाली.

नोकरीच्या आमिषाने 44 जणांची 4.85 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये तासगाव, आटपाडी व जत तालुक्यातील 12 उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर, पंढरपूर, सांगोला येथील 32 जणांचा समावेश आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.

न्यायालयीन लढाईसाठी 20 लाख खर्च

फिर्यादी पोपट सूर्यवंशी म्हणाले, नोकरीच्या आमिषाने फसलेले 30 जण एकत्र आले. पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय झाला. 44 जणांची फसवणूक झाल्याची फिर्याद मी दिली. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली. अटकेसाठीही न्यायालयात पाठपुरावा करावा लागला. फसवणूक झालेली रक्कम परत मिळाली नाही. न्यायालयीन लढाईवर मात्र 20 लाख रुपये खर्च झाले आहेत.

Back to top button