जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे उद्या वाहतुकीत मोठे बदल | पुढारी

जेजुरीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे उद्या वाहतुकीत मोठे बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकासआराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 7 ऑगस्टला पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

जेजुरी पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक :

सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरिता जेजुरी सासवडकडे येणारी जड-अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करून त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुलामार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरून पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन : बारामती व निरा बाजूकडून जेजुरीमार्गे पुणेकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करून ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुलामार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरून पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
सासवड पोलिस स्टेशन : पुणे बाजूकडून जेजुरीमार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करून सासवड- नारायणपूर-कापूरव्होळमार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. वाहतुकीस लावलेले निर्बंध 7 ऑगस्टला होणार्‍या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणार्‍या वाहनांसाठी शिथिल राहतील. नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा

बारामतीत पार्किंगचा प्रश्न कायमच !

नगर : तिघा गोरक्षकांवर जमावाचा हल्ला ; चांदणी चौकातील घटना

पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनलचे उद्घाटन

Back to top button