नगर : तिघा गोरक्षकांवर जमावाचा हल्ला ; चांदणी चौकातील घटना | पुढारी

नगर : तिघा गोरक्षकांवर जमावाचा हल्ला ; चांदणी चौकातील घटना

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणार्‍या संशयित वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांना माहिती देणार्‍या तीन गोरक्षकांवर 10 ते 12 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.3) रात्री 10.30 वाजता नगर शहरातील चांदणी चौकात घडली. याप्रकरणी दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तत्काळ अटक केली. गोरक्षक चांगदेव गोरख भालसिंग (वय 31, रा.धोंडेवाडी, वाळकी, ता.नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी भालसिंग गुरुवारी (दि.3) रात्री सहकारी अविनाश सतीश सरोदे (रा.वाळूंज, ता.नगर), मनोज फुलारी (रा.शिराढोण, ता.नगर) असे त्यांच्या मोटारसायकलवरुन नगरहून शिराढोणकडे नगर-सोलापूर महामार्गाकडून जात असताना चारचाकी वाहन (क्र.एम.एच.16, ए.वाय.6710) नगरकडे येत असतानात त्यांना दिसले.

या वाहनात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहन चालकाने भरधाव नगरकडे पळविले. या गोरक्षकांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी ही माहिती त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना कळविली. ते चांदणी चौकातील आरटीओ कार्यालयासमोर जाऊन थांबले. काही वेळात तेथे निहाल कुरेशी, गुरफान कुरेशी (दोघे रा.झेंडीगेट) व त्यांच्यासोबत अनोळखी 10 ते 12 जण मोटारसायकलवर तेथे आले. या टोळक्याने तिघा गोरक्षकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना दगडाने मारले. त्यामुळे तिघेही जखमी झाले. या टोळक्याने जाताना भालसिंग यांचा मोबाईल व त्यांच्या एका सहकार्‍याचा मोबाईल व मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले एक हजार रुपये घेऊन गेले. त्यानंतर काही वेळात भिंगार कॅम्प पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर भालसिंग यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जाऊन पहाटे फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी निहाल कुरेशी, गुरफान कुरेशी यांच्यासह 10 ते 12 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला.त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलिस उपनिरीक्षक किरण सोळंके, मंगेश बेंडकोळी, हवालदार संदीप घोडके, रेवणनाथ दहिफळे, बबन बेरड, पो.ना. दीपक शिंदे, राहूल द्वारके, अमोल आव्हाड यांच्या पथकाने मुख्य आरोपी निहाल कुरेशी व गुरफान कुरेशी या दोघांना अटक केली.

हेही वाचा : 

पुणे विमानतळावरील कार्गो टर्मिनलचे उद्घाटन

नगर : तणनाशक फवारल्याने जळाले पीक ; शेतकर्‍याचे लाखो रूपयांचे नुकसान

Back to top button