Kolhapur News: विशाळगड परिसरात बीएसएनएल, इंटरनेट सेवेचा बोजवारा | पुढारी

Kolhapur News: विशाळगड परिसरात बीएसएनएल, इंटरनेट सेवेचा बोजवारा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून विशाळगड परिसरातील विशाळगड, गजापूर, दिवाणबाग, बौध्दवादी, मुसलमानवाडी, केंबुर्णेवाडी, भाततळी येथील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. मोबाईल रेंज वारंवार खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. बीएसएनएल टॉवरची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी  झाली आहे. विशाळगड परिसरातील बीएसएनएल मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने मोबाईल ग्राहकांवर ‘कुणी रेंज देता का रेंज’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Kolhapur News)

किल्ले विशाळगड सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतिक आहे. गडाला ऐतिहासिक व धार्मिक महत्व असल्याने गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. गजापूर येथील वाणीपेठ येथे १७ वर्षांपूर्वी बीएसएनएल टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे येथील बहुतांश मोबाईल ग्राहकांकडे बीएसएनएल सिमकार्ड आहेत. तसेच ग्रामपंचायत, पतसंस्था, बँकासह, शिक्षक आदी अनेक कर्मचारी बीएसएनएल फोनसह इंटरनेट सेवेचे ग्राहक आहेत. मात्र, बीएसएनएल सेवेचा वाढता वारंवार बोजवारा उडत असल्याने ऑनलाईन व्यवहार ठप्प होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. (Kolhapur News)

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बीएसएनएल सेवा खंडित राहत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. मध्यंतरी चार-पाच वर्षांपूर्वी जिओचा टॉवर उभारण्यात आल्यानंतर ग्राहकांनी बीएसएनएल सेवेला कंटाळून बीएसएनएल सिमचे जिओ सिममध्ये रूपांतर केले. मात्र, जिओचा टॉवर सुरूच न झाल्याने ग्राहक पुन्हा बीएसएनएल सेवेकडे वळले आहेत. मात्र, बीएसएनएल सेवा असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. दूरसंचार विभागाने सेवेत सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Kolhapur News : मोबाईल बनले केवळ शोपीस

सध्याच्या डिजिटल युगात संपर्काचे प्रमुख माध्यम म्हणून मोबाईलचा वापर होत आहे. धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण असल्याने पर्यटक व भाविक देवदर्शन तसेच गड पाहण्यासाठी येतात. वर्षा पर्यटन असल्याने पर्यटकांचा ओघही अधिक आहे. मात्र, परिसरात आल्यानंतर रेंजचा पत्ताच नसल्याने पर्यटक वैतागत असून संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे या परिसरात आल्यानंतर ग्राहकांचे मोबाईल केवळ शोपीस बनत आहेत.

हेही वाचा 

Back to top button