कोल्हापूर : वारे वसाहतीत सशस्त्र हल्ला; दोघे जखमी | पुढारी

कोल्हापूर : वारे वसाहतीत सशस्त्र हल्ला; दोघे जखमी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वारे वसाहत येथे पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासह दोघे गंभीर जखमी झाले. पृथ्वीराज विलास आवळे (वय 23, मूळ रा. वारे वसाहत, सध्या कळंबा, कोल्हापूर) व प्रेम खंडू माने (18, वारे वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी हा प्रकार घडल्याने परिसरात काहीकाळ तणाव होता. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

जखमी पृथ्वीराज हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गर्दी, मारामारीसह दहशत माजविल्याप्रकरणी गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. गतवर्षी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. जून महिन्यात त्याची जामिनावर सुटका झाली आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, मिरवणुकीसाठी जोडलेली ध्वनियंत्रणा पाहण्यासाठी पृथ्वीराज आवळे वारे वसाहतीत आला होता. यावेळी पूर्ववैमनस्यातून एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणातून वादावादी झाली.

वादावादी सुरू असतानाच एका तरुणाने आवळे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात आवळे याच्या डोक्याला इजा झाली. यावेळी झालेल्या झटापटीत प्रेम माने याच्या तळहातावर शस्त्राचा वार झाल्याने तो जखमी झाला. दोन्हीही जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अनपेक्षित घडलेल्या प्रकारामुळे वारे वसाहतीसह परिसरात गोंधळ उडाला.

शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, प्रभारी पोलिस निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक संदीप जाधव आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींचे जबाब नोंदवले.

पोलिसांचा फौजफाटा दाखल

ऋतिक साठे याने हल्ला केल्याचे पृथ्वीराज आवळे याने जबाबात पोलिसांना सांगितले. तर पृथ्वीराज आवळे याने हल्ला केल्याची माहिती प्रेम माने याने पोलिसांना दिली आहे. दोन गटांत उद्भवलेल्या वादाच्या घटनेनंतर वारे वसाहत परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सांगितले.

Back to top button