कोल्हापूर : वडापावच्या बहाण्याने तीन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण | पुढारी

कोल्हापूर : वडापावच्या बहाण्याने तीन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वडापाव देण्याच्या बहाण्याने तीन वर्षांच्या चिमुरड्याचे हॉकी स्टेडियम परिसरातून अपहरण करणार्‍या मानतेश ऊर्फ संजू बसलिंगाप्पा व्हाराटे (वय 33, रा. सुंदोळे, ता. गोकाक, जि. बेळगाव) याला अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण व जुना राजवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने मुलाची सुखरूप सुटका केली.

मुलाच्या पित्याने मोबाईल फोडल्याच्या रागातून अपहरणाचे कृत्य केल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली आहे. 18 तासांच्या शोधमोहिमेनंतर बालक सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

कर्नाटकातील कर्‍याप्पा सिद्धाप्पा मळगली हे हॉकी स्टेडियमजवळ पत्नी व तीन वर्षांच्या मुलासह वास्तव्यास आहेत. ते गवंडी काम करून उदरनिर्वाह करतात. सोमवारी (दि. 31) सायंकाळी सातला त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे घराजवळून अपहरण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने वडिलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे, राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव, प्रभारी अधिकारी अरविंद काळे यांनी विशेष पथक स्थापन करून मुलासह संशयिताचा छडा लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तीन पथकांद्वारे शोधमोहीम राबविण्यात आली.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरासह शहरातील विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता संबंधित चिमुरड्याला एक अनोळखी व्यक्ती खांद्यावर घेऊन मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने चालत जात असल्याचे निदर्शनास आले. संशयित गोकाकला जाणार्‍या एसटीतून चिमुरड्यासह गेल्याची माहिती मिळाली.

बसस्थानक परिसरात पोलिसांनी सापळा लावून संशयिताचा शोध सुरू केला. संशयित पुन्हा गोकाकहून कोल्हापूर बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. संशयित मानतेश ऊर्फ संजू मुलासह एसटीतून उतरत असतानाच त्याला पोलिसांनी घेरले. त्यास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याने अपहरणाची कबुली दिली.

चिमुरड्याला पाहून आईला रडू कोसळले!

फिर्यादी कर्‍याप्पा मळलगी याने संशयित मानतेश व्हाराटेचा काही दिवसांपूर्वी जमिनीवर आपटून मोबाईल फोडला होता. त्याचा राग मनात धरून मुलाचे अपहरण केल्याची कबुली त्याने दिली. मुलाला पाहून वडील कर्‍याप्पासह त्याच्या आईला रडू कोसळले.

Back to top button