कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण पाकिस्तानने केले का? : दूधगंगा बचाव कृती समितीचा सवाल | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण पाकिस्तानने केले का? : दूधगंगा बचाव कृती समितीचा सवाल

बिद्री : पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी प्रकल्पातंर्गत दूधगंगा नदीवरून इचलकरंजीला पाणी नेण्यास कागलच्या नेत्यांसह नागरिकांचा विरोध होत आहे. आपण सर्व एकाच जिल्ह्यातील असून पिण्यासाठी पाणी मागत आहोत. इचलकरंजी पाकिस्तानातील आहे का? असा सवाल खासदार धैर्यशील माने यांनी केला होता. यावर ‘इचलकरंजीच्या नेत्यांनी पंचगंगेचे प्रदूषण थांबवायला हवे होते. पंचगंगा नदी पाकिस्तानात आहे का? असा प्रतिसवाल दूधगंगा बचाव कृती समितीने पत्रकाद्वारे केला आहे.

इचलकरंजी पाणी योजनेच्या दूधगंगा नदीवरून सुळकूड पाणी योजना बाबत २९ ऑगस्टला जिल्हाअधिकारी यांच्या समवेत कागलमधील सर्व राजकीय नेते व कृती समितीतील कागल व सीमाभागातील लाभार्थी शेतकरी यांची बैठक झाली होती. कागलच्या सर्व नेत्यांनी इचलकरंजीची पाणी योजना होऊ दिली जाणार नाही. ही योजना अन्य ठिकाणावरून करावी, असे सांगितले होते. इचलकरंजीसह १३ गावांना पाणी दिल्यास लाभक्षेत्रातील शेतीला कमी पाणी मिळणार आहे. सध्या गळती व कालव्यांची कामे अपुरी आहेत. पूर्णपणे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नाही. असे असताना पाणी विभाजन झाले तर प्रकल्पाचा मूळ हेतू बाजूला पडणार आहे. लाभक्षेत्रातील ज्यांच्या कालव्यासाठी व विस्थापितांसाठी जमिनी गेल्या त्यांच्यावर अन्याय होणार आहे. काळम्मावाडी लवादात इचलकरंजीला पाणी देण्याचा कुठेही उल्लेख नाही. पण इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी मिळू नये. ही आमची भूमिका नसून ही योजना वारणा किंवा कृष्णा नदीवरून केली तर अधिक सोयीचे होणार आहे. इचलकरंजीकरांनी पंचगंगा शुद्ध ठेवण्याची उपाय योजना आखून सार्वत्रिक प्रयत्न करायला हवे होते.

मंगळवारी इचलकरंजी पाणी योजनेबाबत इचलकरंजीतील नेत्यांनी जिल्हाधिकारी बैठकीत पिण्यासाठी पाणी मागत आहोत. शिल्लक साठ्यातून पाणी देण्याची मागणी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला होता. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी पाकिस्तानात आहे का? असा सवाल केला होता. यावर पंचगंगेचे प्रदूषण तुम्ही व नेत्यांनी थांबवायला हवे होते. मग ती पंचगंगा नदी पाकिस्तानात आहे का? असा प्रतिप्रश्न बचाव कृती समितीने विचारला आहे. पत्रकावर कृती समितीचे धनराज घाटगे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button