कोल्हापूर : हेरवाड येथील शेतातून ५० हजारांच्या टोमॅटोची चोरी | पुढारी

कोल्हापूर : हेरवाड येथील शेतातून ५० हजारांच्या टोमॅटोची चोरी

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा :  शेती उत्पादनातील टोमॅटोचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच मोठा फायदा झाला नव्हता. चार महिन्यापूर्वी टोमॅटोला दर नसल्याने फडात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली होती. महिन्याभरात अचानक टोमॅटोच्या दराने यू-टर्न घेत आपल्या दराचा तोरा वाढवून ठेवला आहे. हेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याच्या शेतातील सुमारे ५० ते ६० हजाराची टोमॅटो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत.

दरम्यान, हेरवाड येथील अशोक मस्के या शेतकऱ्याने गट.क्र. 298 या शेत जमीनीत एप्रिल महिन्यात मध्ये पीक घेतले आहे. टोमॅटोला चांगला भाव असल्याने शेतात त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा आधार घेऊन अज्ञात चोरट्यांनी टोमॅटो चोरून नेत शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांतून खळबळ उडाली आहे.

शिरोळ तालुका हा भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. सध्या टोमॅटोला बाजारात १०० रुपयाच्या पुढे दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनात आघाडी घेतली आहे. हेरवाड दरम्यानच्या मजरेवाडी रस्त्यावरील अशोक मस्के यांनी टोमॅटोची पीक घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाची संततदार सुरू होते याचा आधार घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याला अज्ञात चोरट्यांनी हुलकावणी देऊन टोमॅटो चोरून नेले आहेत. या चोरीमुळे भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. लॉकडाउनच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण जगाला अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. भाजीपाला उत्पादन घेणारा शेतकरी हा फायद्यासाठी नाही तर माणसाच्या मुखात दोन घास पडावेत यासाठी तो शेती करत असतो. टोमॅटोला अचानक दर मिळाला परमेश्वराने शेतकऱ्यांनी आजपर्यंत दिलेल्या योगदानाची परतफेड करत असताना चोरट्यांनी केलेला प्रकार चुकीचा आहे. मागितले असते तर तसेच दिले असते. मात्र, चोरी हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे, अशी खंत शेतकरी अशोक म्हस्के यांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

Back to top button