पिंपरी शहरातील नाट्यगृहांच्या भाडे दरात घट | पुढारी

पिंपरी शहरातील नाट्यगृहांच्या भाडे दरात घट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध पाच नाट्यगृहांचे भाडे व अनामत दरात काही प्रमाणात घट करण्यात आली आहे. कमी केलेले नवे दर 1 ऑगस्टपासून लागू केले जाणार आहे. महापालिकेचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), आचार्य अत्रे रंगमंदिर (संत तुकारामनगर), कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह (भोसरी), नटसम्राट निळू फुले रंगमंदिर (पिंपळे गुरव), ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (आकुर्डी) आहे.

या नाट्यगृहांच्या भाडे दरात व अनामत रकमेत 1 जुलैपासून दुपटीपेक्षा अधिक दरवाढ केली होती. शहरातील रंगकर्मी, नाटककार, कलाकार, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालय यांनी भाडे दर कमी करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने काही प्रमाणात दर कमी केले आहेत. क्रीडा विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कलाकार, नाट्य संस्था, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवीन निर्णयानुसार, दरवर्षी भाडे दरात 10 टक्के वाढ करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कार्यक्रमास शुल्कात 50 टक्के आणि शासकीय कार्यक्रमांना 30 टक्के सवलत दिली जाणार आहे. नाट्यगृहाची वेळ सकाळी 9 ते रात्री 12 अशी असणार आहे. नाट्यगृहाला कोणाला मोफत दिले जाणार नाही. जादा प्रकाश व्यवस्था, ध्वनी यंत्रणा, शूटींग, पंखे, लाईटच्या माळा, वायरलेस माइक, व्हीआयपी रूम, पडदे, खुर्ची, टेबल, सोफा, निवासी व्यवस्था, सीडी प्लेअर, इस्त्री, समई आदी साहित्यासाठी वेगवेगळे भाडे लागू केले आहे.

शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवसांसाठी तीन तासासाठी नाटक, ऑर्केस्टा, संगीत व नृत्य कार्यक्रमासाठी 8 हजार 496 रूपये, प्राथमिक शाळेसाठी तीन तासासाठी 15 हजार 930 रूपये आणि इतर कोणतीही व्यक्ती व संस्थांसाठी 17 हजार 523 आणि शाळा व महाविद्यालयाच्या 5 तासांच्या कार्यक्रमासाठी 25 हजार 488 रूपये भाडे असणार आहे. तिकीट असलेल्या कार्यक्रमासाठी 12 हजार 744 रूपये व इतर कोणतीही व्यक्ती व संस्थेसाठी 17 हजार 523 रूपये भाडे असेल. रंगीत तालीमसाठी सकाळी 9 ते 11 या दोन तासासाठी दिवसानुसार 2 हजार 655 ते 6 हजार 372 रूपये शुल्क आहे.

प्रा. मोरे व माडगुळकर नाट्यगृहासाठी सोमवार ते गुरूवार या दिवसासाठी 7 हजार 80 रूपये ते 23 हजार 600 रूपये भाडे आहे. शुक्रवार ते रविवार या दिवसासाठी 9 हजार 440 रूपये ते 28 हजार 320 रूपये भाडे असणार आहे. सकाळच्या दोन तास रंगीत तालमीसाठी 2 हजार 950 रूपये ते 7 हजार 80 रूपये भाडे भरावे लागणार आहे. अनामत रक्कम 12 हजार ते 30 हजार रूपये आहे.

दर कमी करण्याच्या मागणीची पालिकेकडून दखल

व्यवस्थापन व देखभाल खर्च परवडत नसल्याने महापालिकेने 1 जुलैपासून नाट्यगृहाचे भाडे दरात वाढ केली होती. शहरातील कलाकार, रंगकर्मी, सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालय आदींनी भाडे दर कमी करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. अनेक कार्यक्रम हे मोफत असतात. त्यातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

असे असतील 1 ऑगस्टपासून नवे दर

आचार्य अत्रे रंगमंदिर, अंकुशराव लांडगे व निळू फुले या तीन नाट्यगृहात सोमवार, मंगळवार, बुधवार व गुरूवार या चार दिवसांसाठी भाडे दर पुढीलप्रमाणे असणार आहे. तिकीट दर 100 रूपयांपर्यंत किंवा मोफत असलेल्या मराठी किंवा इतर भाषेतील नाटक, ऑकेस्ट्रा, मराठी संगीत, नृत्य कार्यक्रमासाठी तीन तासासाठी 6 हजार 372 रूपये भाडे असेल. तर, शंभर रूपयांपेक्षा अधिक तिकीट असलेल्या कार्यक्रमास 10 हजार 620 रूपये भाडे असणार आहे.

प्राथमिक शाळेसाठी तीन तासासाठी 13 हजार 275 रूपये भाडे असेल. इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेच्या 3 तासाच्या कार्यक्रमासाठी 15 हजार 930 रूपये व तिकीट असलेल्या कार्यक्रमास 17 हजार 523 रूपये भाडे असणार आहे. शाळा व महाविद्यालयाच्या 5 तासांच्या कार्यक्रमासाठी 21 हजार 240 रूपये भाडे असेल.

हेही वाचा

सोलापूर : सराईत गुन्हेगार सद्दाम शेख स्थानबध्द

रत्नागिरी : माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्यांसाठी पीक स्पर्धा

Back to top button