धायरी : सिंहगड रस्त्याचा पदपथ मोकळा | पुढारी

धायरी : सिंहगड रस्त्याचा पदपथ मोकळा

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : हवेली पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेली वाहने सिंहगड रस्त्यावरील पदपथावर व अभिरुची मॉल परिसरातील मोकळ्या जागेत ठेवण्यात आली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी पडून असल्याने रहदारीस अडथळा होत होता. याबाबत दैनिक ‘पुढारी’त नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पोलिस प्रशासनाने अखेर ही वाहने उचलण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलिसांनी विविध गुन्ह्यांत जप्त केली वाहने पोलिस ठाण्याला जागा नसल्यामुळे अभिरुची मॉल परिसरातील मोकळ्या जागेत आणि सिंहगड रस्त्यावरील पदपथावर ठेवण्यात आली होती. या वाहनांमध्ये झाडाझुडपे वाढली होती. तसेच कचराही साचला होता. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.

याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुनीता माने यांनी या ठिकाणी असलेली वाहने उचलण्याची कार्यवाही सुरू केली आहे. रहिवासी राजाभाऊ कांबळे म्हणाले, की बर्‍याच दिवसांपासून या ठिकाणी या वाहनांचा खच पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत होता. मात्र, वाहने हलविण्यात येणार असल्याने परिसर मोकळा श्वास घेणार आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून ही वाहने या ठिकाणी पडून असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून सर्वांची सुटका होण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने ही वाहने येथून हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
-अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलिस ठाणे

हेही वाचा

नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी

नेवासा : पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

बालिंगे पुलाला धोका; कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद

Back to top button