नेवासा : पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत | पुढारी

नेवासा : पाऊस लांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. खरिपाचे नियोजन कोलमडून जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. यातच शासन काही देईना अन् निसर्ग काही खाऊन देईना, अशी गत तालुक्यातील शेतकर्‍यांची झाली आहे. एकदाच पावसाने मध्यंतरी हजेरी लावून शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. त्यावरच कपाशी व अन्य पिके घेण्यात आली आहेत. रोजच ढगाळ वातावरण निर्माण होते. तालुक्यात कुठे तरी झिमझिम पाऊस पडला जातो.

या किरकोळ सरींनी शेतात तण वाढत आहे. सध्या कपाशीमधील तण काढण्याचे काम वेगात चालू आहे. काही ठिकाणी रोगट वातावरणामुळे कपाशींवर फवारणी शेतकरी करताना दिसत आहेत. कपाशांची वाढच हवी होताना दिसत नाही. खुरपणींवरच शेतकर्‍यांचा खर्च होत आहे. दमदार पावसाचा सध्या नितांत गरज आहे.

जुलै संपला आला तरी दमदार पाऊस नसल्याने रब्बी सारखाच खरिपाला फटका बसतो की काय? अशी शंका शेतकर्‍यांना वाटत आहे.
यंदा तालुक्यात कपाशीची 23 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होण्याचे उदिष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला आहे. आता पाऊस नसल्याने शेतकरी हबकला आहे. रब्बीमध्ये गव्हाची नासाडी व कांद्याचे तीनतेरा वाजले. रब्बीमधून शेतकरी बाहेर येण्याचा प्रयत्न करित आहे. पावसाने दडी मारल्याने खरिपातील कपाशी व अन्य पिकांचे कसे होणार? या चिंतेने शेतकर्‍यांना ग्रासले आहे.

हेही वाचा

नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

राहुरी : ग्रामीण रुग्णालयासाठी आ. प्राजक्त तनपुरे आग्रही

भागवत, शहा, मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन

Back to top button