अकरावी प्रवेश विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज | पुढारी

अकरावी प्रवेश विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी आज (दि. 24) सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात येणार आहे, तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 27 जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीचे कोटा तसेच कॅपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 17 ते 20 जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती, तर 24 जलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येऊन 27 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

17 ते 27 जुलैदरम्यान कोटाअंतर्गत प्रवेशदेखील होणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशासाठी 326 महाविद्यालयांत 97 हजार 815 कॅपच्या तसेच 18 हजार 135 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 15 हजार 950 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत झालेल्या तीन फेर्‍यांमध्ये कोटा आणि कॅप मिळून 44 हजार 114 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर प्रवेशासाठी 71 हजार 836 जागा उपलब्ध आहेत.

परंतु विशेष फेरीसाठी 28 हजार 963 विद्यार्थ्यांनीच पसंतीक्रम भरले आहेत. त्यामुळे हेच विद्यार्थी प्रवेशाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत नियमित फेरीत प्रतिबंधित झालेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. विशेष फेरीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला प्रतिबंधित केले जाणार नाही. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करायचा असेल, तर विद्यार्थी लॉगिनमध्ये जाऊन प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि विद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

पिंपरी : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ कायम

अभ्यास आणि उपायांकडे दुर्लक्ष केल्याने पंचगंगेला पूर : विज्ञान प्रबोधिनी

विकास निधीत पुण्याचे आमदार मालामाल

Back to top button