Panchaganga Flood Kolhapur | पाणलोटात अतिवृष्टी नसताना पंचगंगेला का आला पूर?, जाणून घ्या १२ कारणे | पुढारी

Panchaganga Flood Kolhapur | पाणलोटात अतिवृष्टी नसताना पंचगंगेला का आला पूर?, जाणून घ्या १२ कारणे

उदय कुलकर्णी, उदय गायकवाड, अनिल चौगुले ( विज्ञान प्रबोधिनी, कोल्हापूर )

पंचगंगेच्या पूर आलेल्या पाणलोटात अतिवृष्टी झालेली नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात आजवर केवळ २३४१ मिमी पाऊस झाला. अलमट्टी धरणात पाणीसाठा ६२ टीएमसी असून ११४४४५ क्यूसेस इतकी पाणी आवक आहे. धरण भरायला आणि बॅक वॉटरचा परिणाम होण्यासाठी अद्याप पुरेसा अवधी आहे. त्यांनी सध्या विसर्ग करण्याची गरज नाही. अलमट्टी धरण बांधून झाल्यावर काय परिणाम होतील याबाबत विज्ञान प्रबोधिनीने ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण अभ्यासक उदय कुलकर्णी यांच्या लेखाद्वारे १९९६ मध्ये मांडणी केली होती. सध्यस्थितीत पुरासाठी अलमट्टी हे कारण नाही. २००५ व २०१९, २०२१ चे पूर अधिक काळ राहण्यास व वाढ होण्यास अलमट्टी हे कारण ठरले होते. प्रत्येक पुराचा स्वतंत्र अभ्यास केला जावा अशी मागणी यापूर्वी देखील केली होती. (Panchaganga Flood Kolhapur)
)

कोयना धरण साठा सध्या ५१.७८ टीएमसी इतकाअसून विसर्ग सुरू नाही. त्याचबरोबर कृष्णा, वेण्णा, उरमोडी, मांड, वारणा, दूधगंगावरील धरणे भरली नाहीत. त्यामुळे त्यांचे विसर्ग सुरू नाहीत. आज पंचगंगा नदीने मात्र, पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली.

राधानगरी ८८ टक्के, कुंभी ८० टक्के, कासारी ७९ टक्के, तुळशी ४६ टक्के इतकेच भरले आहे. ही धरणे अद्याप भरली नसली तरी निश्चित केलेल्या निकषानुसार जास्तीचे पाणी साठवायचे नाही म्हणून कुंभीतून ४००, कासारीतून १००० क्यूसेस विसर्ग सुरू केला आहे. राधानगरीमध्ये विजघरासाठीच विसर्ग करण्याची सोय असल्याने त्यामागे १४०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट दुरुस्त करायला सरकारने पैसे दिले गेले नसल्याने तेथून यापेक्षा अधिक पाणी विसर्ग करता येणार नाही.

स्वयंचलित सात दरवाजे हे धरण पूर्ण भरल्यानंतर आपोआप कार्यान्वित होतील. त्यातून होणारा विसर्ग खूप मोठा परिणाम करणार नाही. मात्र, त्यामुळे पूर नियंत्रण करणे हे देखील शक्य नाही. पंचगंगेच्या खोऱ्यात सद्या धरणांमधून २८०० क्यूसेस इतकेच पाणी विसर्ग सुरू आहे. ही बाब तेथील व्यवस्थापनाचे दृष्टीने नेहमीची आहे.

शिवाय लगतच्या वारणा नदीमध्ये ९०० क्यूसेस विसर्ग सुरू आहे. हे धरण मात्र, ७४ टक्के भरले आहे. दूधगंगा धरण केवळ ४७ टक्के भरले आहे. कोदे प्रकल्प पूर्ण भरला असल्याने ९३६ क्यूसेस विसर्ग सुरू आहे. कृष्णेत पाण्याची नैसर्गिक भिंत तयार झाल्याने पंचगंगेचे पाणी पुढे न सरकण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या वारणा, दूधगंगा, कृष्णा, कोयना अद्याप परिणाम करीत नाहीत.

राजाराम बंधारा ५५०२१ क्यूसेस विसर्ग करत असून त्यामधील धरणातून होणारा ४६३६ क्यूसेस वजा केले तर ५०३८५ क्यूसेस हे पाणी केवळ धरणा खेरीज खुल्या क्षेत्रात पडलेल्या पावसाचे आहे. राजाराम बंधारानंतर सुर्वे व रुई बंधारे वगळता इचलकरंजी इशारा पातळीला पोहोचलेली नाही. शिवाजी पुल व शिरोली पुल, इचलकरंजी येथील पाणी पातळी पहाता ती पायऱ्याप्रमाणे उतरत गेलेली दिसते. याचा अर्थ पंचगंगेच्या खोऱ्यात पडलेल्या पावसाचा हा पूर आहे.

हा आता पूर का आला?, इशारा पातळी का गाठली? हे समजून घेणे, शोधणे गरजेचे आहे. दिशाभूल करून पुराची खरी कारणे न अभ्यासणे किंवा लपवणे हे धोक्याचे आहे. (Panchaganga Flood Kolhapur)

सध्याच्या पुराची कारणे…

१. नद्याची नैसर्गिक वळणे.

२. नद्यांच्या पात्रात वाढलेले गाळाचे प्रमाण.

३. धरण क्षेत्रात वाढलेले गाळाचे प्रमाण.

४ नद्यांच्या पात्रामधील अतिक्रमणे.

५. नदी पात्रात असलेले बंधारे.

६. बेकायदा पुल आणि त्याचे भराव यामुळे तयार झालेली धरण सदृश्य परिस्थिती.

७. पूरबाधित क्षेत्रात झालेली बांधकामे.

८. रस्त्यांचे भराव व खरमाती, कचऱ्याचे ढीग.

९. पूर बाधित क्षेत्रात उसाचे पीक

१०. राधानगरी धरणातून वीज घराऐवजी पाण्याचा विसर्ग दरवाजा नादुरुस्त असल्याने न करता येणे.

११. खुल्या क्षेत्रात होणारा पाऊस मोजता न येणे आणि त्यावर नियंत्रण नसणे.

१२. पुलाच्या कमी मोऱ्यातून पाणी पुढे जाण्यासाठी लागणारा विलंब.

हीच पुराची ठळक कारणे आहेत हे सध्या उद्भवलेल्या पूर परिस्थिती पाहाता स्पष्ट झाले आहे.

धरणे रिकामी ठेवा, अलमट्टी मुळेच पूर येतो, अधिकारी अभियंते ऐकत नाहीत असे मुद्दे मांडत यावर्षी पूर येणारच नाही असे ठामपणे मांडणारे जल संपदा विभागाचे निवृत्त अभियंता विजय दिवाण व प्रभाकर केंगार यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. गेली तीन वर्षे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून देखील एकही उपाय केला नाही. त्याचे नियोजन केले नाही. शहरात अन्य ठिकाणी पूर आला नसली तरी तेथील कारणे अभ्यासात घेवून त्यावर काही ही उपाय किंवा तसे नियोजन केले नाही. केवळ अलमट्टीकडे पूर्ण दोष दाखवून इथला पूर रोखता येत नाही. पुराची प्रत्येक वेळी कारणे भिन्न दिसतात. पूर नियंत्रण हे केवळ धरणामुळे होते ही अंधश्रद्धा ठरली आहे.

या मर्यादित पुराचा स्वतंत्र अभ्यास लक्षात घेवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मेलद्वारे केली. ही मागणी विज्ञान प्रबोधिनी कोल्हापूरने केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button