विकास निधीत पुण्याचे आमदार मालामाल | पुढारी

विकास निधीत पुण्याचे आमदार मालामाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देणार्‍या शहर आणि जिल्ह्यातील आमदारांना आता विकास निधीची लॉटरी लागली आहे. महाविकास आघाडी काळात या आमदारांना मिळालेल्या निधीला शिंदे सरकारच्या काळात देण्यात आलेली स्थगिती नगरविकास खात्याकडून आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे या आमदारांचा निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी भाजप-शिवसेनेसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. हे आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना नगरविकासच्या माध्यमातून कोट्यवधीच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, सत्ता पालटल्यानंतर त्याला स्थगिती देण्यात आली होती. हे आमदार सत्तेत आल्याने लगेचच ही स्थगिती उठविण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते, मावळचे सुनील शेळके, पिंपरीचे अण्णा बनसोडे, वडगावशेरीचे सुनील टिंगरे यांना त्यांच्या मतदारसंघातील नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिका हद्दीतील कामांसाठी हा निधी मिळणार आहे. त्यात वडगाव शेरीचे आमदार टिंगरे व पिंपरीचे आमदार बनसोडे यांच्या सर्वाधिक प्रत्येकी 10 कोटींच्या निधीवरील स्थगिती उठली आहे. त्यांच्या मतदारसंघातील पालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी हा निधी त्यांना आता खर्च करता येऊ शकणार आहे.

खेडचे आमदार मोहिते यांच्या मतदारसंघात येणार्‍या राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या तीन नगर परिषद क्षेत्रांसाठी 5 कोटी, मावळचे आमदार शेळके यांच्या मतदारसंघात येणार्‍या देहूरोड कटक मंडळसाठी 5 कोटी, असा एकूण या चार आमदारांना 30 कोटींचा निधी केवळ एकाच खात्यामधून मिळणार आहे. याशिवाय, अन्य खात्यांमधील निधी या आमदारांना आता मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे आमदार आता विकास निधीच्या बाबतीत मालामाल झाले असून, मतदारसंघातील कामांनाही ते न्याय देऊ शकणार आहेत.

पवारांकडून वाढदिवसाचे ‘रिटर्न गिफ्ट’

अजित पवारांना साथ देणार्‍या अनेक आमदारांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळावा, यासाठी सत्तेत सहभागी होत असल्याचे सांगितले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदारांना तसे आश्वासन दिले होते. त्यानुसार समर्थक आमदारांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून जो निधी मंजूर झाला होता. त्यावरील स्थगिती वाढदिवसाच्या दिवशीच उठवून पवार यांनी आमदारांना ‘रिटर्न गिफ्ट’ दिले असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा

पिंपरी : लहान मुलांमध्ये डोळ्यांची साथ नियंत्रणात

पिंपरी : संरक्षण विभागाच्या पडीक जागांमध्ये साकारणार गृहप्रकल्प

पिंपरी : सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Back to top button