NDA Allies Meet | ‘आमची एकजूट आहे आणि एकमतही!’ एकनाथ शिंदेंचे ट्विट चर्चेत | पुढारी

NDA Allies Meet | 'आमची एकजूट आहे आणि एकमतही!' एकनाथ शिंदेंचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी एनडीए नेत्यांची बैठक पार पडली. एनडीएच्या या बैठकीत ३८ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले होते. या बैठकीनंतर शिंदे यांनी ‘आमची एकजूट आहे आणि एकमतही!’ असे ट्विट करत म्हटले आहे.

”दिल्लीत झालेल्या या बैठकीमध्ये एनडीएने केलेले ठराव मांडण्याची संधी मला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३३०+ जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. एनडीए पक्षांची एकजूट हा संकल्प सिद्धीस नेईल, हा विश्वास आहे,” मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. (NDA Allies Meet)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या दूरदृष्टीने १९८९ मध्ये भाजप-शिवसेनेची युती आकाराला आली. विचारधारेचा भक्कम पाया आणि काँग्रेसला कडवा विरोध हा या मैत्रीचा आधार होता.
भाजप – शिवसेनेच्या या मैत्रीला आणि विचारांवर आधारित एकजुटीला आता ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तर, एनडीएच्या स्थापनेला २५ वर्षे झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मैत्री दृढ झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवून बलशाली, नवा भारत घडवण्यासाठी ३३० हून अधिक जागांवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

२०२४ मध्ये पुन्हा एकदा भारताचे नागरिक एनडीएला आणि पर्यायाने नव्या भारताच्या समृद्ध वाटचालीला कौल देतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे शिंदे यांनी पुढे म्हटले आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीमध्ये एनडीएच्या मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीतून व्यक्त केला. २०१४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती, आज ती पाचव्या क्रमांकावर आहे. एनडीएच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचणारच, असा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला.

अशोक हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्वाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच शिंदे बसले. तर, अमित शहा यांच्या बाजूला अजित पवार बसले होते. (NDA Allies Meet)

हे ही वाचा :

Back to top button