Dhule News | पाण्यासाठी ग्रामस्थांचा सामोडे चौफुलीवर ‘रास्ता रोको’ | पुढारी

Dhule News | पाण्यासाठी ग्रामस्थांचा सामोडे चौफुलीवर 'रास्ता रोको'

पिंपळनेर,(जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा : नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी सामोडे चौफुलीवर शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी महिलांनी हातात हंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनानंतर ग्रामस्थांनीही महिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सहभाग नोंदविला.

साक्री तालुक्यातील सामोडे येथील घोड्यामाळ परिसर, यशोदा नगर, कन्हैयालाल नगर, जेबापूर रोड, टेंभा रोड, पोलीस स्टेशन हद्द येथील ग्रामस्थ महिलांनी अनियमित पाणीपुरवठ्या विरोधात प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी महिलांनी सामोडे चौफुलीवर एकत्र येत हंडा, बादल्या, पिंप, टाकी घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. या भागात दर पाच दिवसांनी पाणीपुरवठा होतो त्यातही फक्त एक तास पाणी येते. तो दिवस गेला तर पुढचे 8 ते 10 दिवस वाट पहावी लागते. पाण्यासाठी महिला-पुरषांसह लहानग्यांचीही वणवण आहे. मात्र, तरीही सामोडे ग्रामपंचायत अजिबात लक्ष देत नाही अशी तक्रार ग्रामस्थांनी सामोडे चौफुलीवर बसून केली. काही वेळ येथे वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासनाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन संपविले.

दरम्यान, अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हेही वाचा –

Back to top button