एनडीएच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचणारच : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

एनडीएच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचणारच : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकीमध्ये एनडीएच्या मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित एनडीएच्या बैठकीतून व्यक्त केला. २०१४ मध्ये देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावर होती, आज ती पाचव्या क्रमांकावर आहे. एनडीएच्या तिसऱ्या टर्ममध्ये देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचणारच, असा दावा पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) यावेळी केला.

पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले, १९८८ मध्ये एनडीए स्थापन करण्यात आला. पंरतु, कुणा विरोधात नाही. कुणाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नाही. तर, देशात स्थिरता आणण्यासाठी एनडीए स्थापन करण्यात आली होती. एनडीएच्या उभारणीत अटल वाजपेयी यांचे योगदान महत्वाचे आहे. लालकृष्ण आडवाणी, प्रकाश सिंह बादल, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, अजित सिंह, रामविलास पासवान यांची देखील महत्वाची भूमिका राहीली आहे. आज, प्रकाश सिंह बादल आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी आपल्या सोबत बसले आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

विरोधात असताना एनडीएने नेहमी सकारात्मक राजकारण केले. जनादेशाचा अपमान एनडीएने कधीच केला नाही. सरकार विरोधात काम करण्यासाठी कधीही परराष्ट्राकडून मदत मागितली नाही. विरोधात असतांना कधीही देशाच्या विकासात अडथळे आणले नाही, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. देशात राजकीय आघाडीची एक दीर्घ परंपरा राहीली आहे. पंरतु, ज्या आघाडी नकारात्मकतेवर अवलंबून होत्या त्या कधीच यशस्वी झाल्या नाहीत. कॉंग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाडीचा वापर केला. कॉंग्रेसने सरकार बनवले आणि सरकारे अस्थिर केले. पंरतु, एनडीएचे लक्ष विकसित भारताचे आहे. आत्मनिर्भर भारताचे आहे.

आघाडी जेव्हा सत्तेच्या मजबुरीने, भ्रष्टाचाराच्या उद्देशाने, परिवारवादाच्या धोरणावर आधारीत असते, जातिवाद आणि प्रादेशिकवाद समोर ठेवून केले जाते तेव्हा ती देशासाठी अत्यंत नुकसान करणारी ठरते. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या.पंरतु, सरकार एनडीएचीच बनवण्यात आली, असे मोदी म्हणाले.

लोक आज मोदींना शिव्याशाप देण्यात वेळ घालवत आहेत. देशासाठी त्यांनी विचार केला असता, गरीबांबद्दल विचार करण्यात त्यांनी वेळ घालवला असता ते चांगले झाले असते. अशांसाठी आपण केवळ प्रार्थना करू शकतो. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक जवळजवळ तर येवू शकतात. पंरतु, एकमेकांजवळ येवू शकत नाही. त्यांना आपल्या कार्यकर्त्यांची देखील चिंता नाही. आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्यांचा अचानक सत्कार करावा, अशी अपेक्षा ते आपल्या कार्यकर्त्यांकडे ठेवतात, अशा शब्दात मोदींनी विरोधकांच्या आघाडीवर अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

आम्ही देशसेवेसाठी सर्वांचे योगदान स्वीकारले आहे. त्यांचे कौतुक केले आणि त्यांना सन्मानित केले आहे. लोकशाहीची ही मुळ भावना एनडीएच्या कार्यशैलीत प्रत्येक ठिकाणी दिसेल.एनडीए सरकाने गेल्या ९ वर्षात भ्रष्टाचाराचे प्रत्येक मार्ग बंद करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले आहे. पूर्वी सत्तेच्या केंद्रात जे 'मध्यस्थ' फिरत होते त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जनधन, आधार मोबाईलची त्रिशक्तीतून गरीबांचे हक्क हिरावून घेण्यापासून रोखले आहे. २०१४ पूर्वीच्या आघाडी सरकारचे उदाहरण आपल्या समोर आले. पंतप्रधानांच्या वर एक 'श्रेष्ठी', धोरणात्मक लकवा, निर्णय घेण्यात अक्षमता, अव्यवस्था तसेच अविश्वास, ओढताण आणि भ्रष्टाचार , लाखो कोट्यवधींचे घोटाळे बघायला मिळाले, अशा शब्दात पंतप्रधानांनी यापूर्वीच्या सरकारवर टीकास्त्र डागले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विशेष स्थान

अशोक हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्वाचे स्थान देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच शिंदे बसले. तर, अमित शहा यांच्या बाजूला अजित पवार बसले होते.

राज्यात ४५ लोकसभेच्या जागा निवडून आणण्याची ग्वाही

महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत पंतप्रधानांनी दिली. तर, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एकत्र असू, असे अजित पवार बैठकीत म्हणाले. उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकसभेच्या ८० जागा आहेत. या राज्याच्या खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक ४८ जागा आहेत. या ४८ पैकी ४५ जागा जिंकून आणू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची चर्चा आहे.

एनडीएच्या बैठकीत या पक्षांचा सहभाग

शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष (पशुपति कुमार पारस), अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, अपना दल (सोनेलाल), पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, ऑल झारखंड स्टुडंट युनियन, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, मिझो नॅशनल फ्रंट, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा, नागा पीपल्स फ्रंट, नागालँड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), आसाम गण परिषद, पट्टाली मक्कल काची, तमिळ मानिला काँग्रेस, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, शिरोमणी अकाली दल (संयुक्त), महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, जननायक जनता पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी, जन सुराज्य शक्ती पार्टी, कुकी पीपल्स अलायन्स, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (मेघालय), हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, निषाद पक्ष, ऑल इंडिया एनआर काँग्रेस, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, जनता सेना पक्ष, हरियाणा लोकहित पार्टी, भारत धर्म जन सेना, केरळ कामराज काँग्रेस, पुथिया तमिळगाम, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान) आणि गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट

महायुतीमुळे महाराष्ट्रातील सरकार बळकट-मुख्यमंत्री

शिवसेना हा रालोआ आणि भाजपचा जुना सहकारी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत.देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान करत असून आमचा पक्ष त्यांच्या सोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीला जाण्यापूर्वी व्यक्त केली.राज्यात अजित पवार हे सत्तेत आल्याने महायुती तयार झाली असून सरकार अधिक मजबूत झाले आहे.त्यामुळे आता एकीकडे विचारधारा असलेली रालोआ आहे तर दुसरीकडे नेता नसलेली आघाडी आहे.याद्वारे पंतप्रधान मोदी यांचे यश आणि विरोधी पक्षांचे अपयश अधोरेखित होते,असे शिंदे म्हणाले. गेल्या ९ वर्षात भारताचा विकास झाला असून अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होऊन विक्रम मोडला जाईल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील या पक्षांना निमंत्रण

मित्रपक्षांपैकी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीच निमंत्रण देण्यात आले होते.पंरतु, भाजपचे सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि दिवंगत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष यांना मात्र बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news