पुणे जिल्हा परिषद निवडणूक : इच्छुकांचे तूर्तास ‘वेट अँड वॉच’ | पुढारी

पुणे जिल्हा परिषद निवडणूक : इच्छुकांचे तूर्तास ‘वेट अँड वॉच’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा विषय मागेच पडला. सध्या निवडणुकीचे चिन्हेच दिसत नसल्याने इच्छुकांनी संपर्क दौरे गुंडाळले आहेत. त्याशिवाय नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची याचादेखील पेच इच्छुकांच्या पुढे उभा राहिला आहे. परिणामी, तूर्तास तरी जिल्हा परिषद इच्छुकांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. संपर्क दौरे गुंडाळले असले तरी इच्छुकांचे ‘ब्रँडिंग’ मात्र जोरात सुरू आहे. इच्छुकांना मतदारसंघात आपले आव्हान कायम टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवावी लागत आहे. वाढदिवस, लग्न समारंभ, दशक्रिया विधी अशा कार्यक्रमांना हजेरी लावताना मात्र मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यातूनच एखादा कार्यक्रम चुकल्यास नाराजीचा सामना करावा लागत आहे. वेगवेगळ्या सणांचा वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून आपल्या ’ब्रँडिंग’साठी उपयोग करून घेतला जात आहे. हे सर्व करताना बजेटमध्येसुद्धा मोठी वाढ झाली.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. त्यातून काहींची नाराजीसुद्धा वाढत गेली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांत निर्माण झालेला उत्साह टिकवून ठेवण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारापुढे कायम आहे. कार्यकर्ते दुरावू नये म्हणून अनेकांची मनधरणी करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेत नागरिकांचे प्रश्न घेऊन येणार्‍यांची गर्दीदेखील कमी झाल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर सध्या प्रशासक आहेत. प्रशासकांकडून आपले काम करून घेण्यासाठी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य तसेच इच्छुकांच्या जिल्हा परिषदेत हेलपाटे सुरू होते.

आपल्या गटात जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेल्या दोन गट तयार झाल्याने ही गर्दी अचानक कमी झाली. याशिवाय ग्रामीण भागातील इच्छुकांचे संपर्क दौरे देखील थांबलेले आहेत.
कोणत्या ना कोणत्या कारणाने निवडणुका लांबणीवर पडत चालल्या आहेत. परंतु, सातत्याने निवडणुका लांबणीवर पडत असल्याने इच्छुक उमेदवारांना कार्यकर्ते सांभाळून ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुकीचा बिगुल वाजावा अशी इच्छुक उमेदवारांची अपेक्षा होती.

हे ही वाचा :

टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे : खा. उदयनराजे

लसीकरणासाठी केेंद्राचे ‘यू विन’अ‍ॅप ; वंचित मुलांपर्यंत पोहोचणे शक्य होणार

Back to top button