टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे : खा. उदयनराजे | पुढारी

टीका करणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे : खा. उदयनराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  एखाद्या माणसाने केलेल्या विकासकामांवरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते. गेल्या तीन दशकाच्या राजकारणात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासकामे केली. उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकास कामांवर टीका करतात त्यांनी आपण स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्यावर केली.

सातारा विकास आघाडी सुसंवाद अभियानांतर्गत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, किशोर शिंदे, निशांत पाटील, वसंत लेवे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, संग्राम बर्गे, संजय पाटील, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, एखादा जो कोणी पदावर बसतो आणि कामे करत नाही त्याची त्या पदावर बसण्याची लायकी नसते. उदयनराजे मात्र विकास कामे करताना तोंडाच्या वाफा सोडत नाही . एखाद्याची पत ही त्याने केलेल्या विकास कामावरून ठरवली जाते. वीस वर्षांपूर्वी सातार्‍यात आलो तेव्हा मूलभूत सुविधांची प्रचंड अडचण होती मात्र आज सातारा विविध विकासकामांनी युक्त आहे. जे नावे ठेवतात त्यांनी ती जरूर ठेवावी. मात्र, स्वतःला अगोदर विचारावे आपण काय काम केलं. उगाच नुसतं हे केलं ते केलं असं सांगण्यापेक्षा मूलभूत विकास कामे आपण त्यावेळी का केली नाही ? याची उत्तरे द्यावी, असा टोलाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला.

खा. उदयनराजे पुढे म्हणाले, सातारा एमआयडीसीची स्थापना होऊन इतकी वर्ष झाली त्याचा विकास का झाला नाही? छत्रपती शाहू स्टेडियम सातार्‍यात असतानाही येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने भरू शकत नाही, ही शोकांतिका आहे. सातार्‍याला उन्नत दर्जा देण्याकरता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मी कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी विलासपूर सारख्या भागात साडे पाच कोटींची विकासकामे मंजूर केली आहे. आम्ही सर्व उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. दरम्यान, या मेळाव्यात जलमंदिर येथे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी मांडल्या. त्यावर याबाबत स्पष्टपणे सूचना करावी त्या पध्दतीची व्यवस्था करायला सांगतो. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका त्याला काहीतरी बेस ठेवा, अशी कानउघडणी उदयनराजेंनी केली.

Back to top button