बांगला देशातील खासदाराच्या हत्येमागे हनी ट्रॅप | पुढारी

बांगला देशातील खासदाराच्या हत्येमागे हनी ट्रॅप

कोलकाता/ढाका, वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे खासदार अनवारूल अजीम अनवर यांची पाच कोटींची सुपारी देऊन कोलकात्यात हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हनी ट्रॅप आणि सोन्याच्या तस्करीचे पदरही या हत्येमागे असल्याचे भारत-बांगला देशातील तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे आले आहे.

दरम्यान, कोलकाता सीआयडीने जिहाद हवलदार या कसायासह शीलास्ती रहमान या युवतीस या हत्येप्रकरणी अटक केली आहे. तो व्यवसायाने कसाई आहे. जिहाद हवलदार असे त्याचे नाव आहे.

शीलास्तीने ओढले जाळ्यात

शीलास्ती रहमान या तरुणीच्या माध्यमातून खासदार अनवर यांना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यात आले होते. खासदार अनवर या महिलेेसोबत 13 मे रोजी फ्लॅटमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले आहे. शीलास्ती हिच्यासोबत फ्लॅटमध्ये दोघे कॉन्ट्रॅक्ट किलर्स गेले होते.

मुख्य सूत्रधार शाहीन

या हत्येमागे अनवर यांचा जवळचा मित्र अकतारुजमा शाहीन याचा हात असल्याचे पुढे आले आहे. शाहीन याने पाच कोटी रुपये देऊन अनवर यांची हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अकतारुजमा शाहीन हा खासदार अनवर यांचा जवळचा मित्र आहे. दोघांमध्ये सोन्याच्या तस्करीच्या व्यवसायात भागीदारी होती. या व्यवसायातून वाद निर्माण झाला होता.

सूत्रधार अमेरिकेस पसार

हत्येचा कट रचल्यानंतर शाहीन 10 मे रोजी ढाक्यात आला होता. 12 मे रोजी खासदार अनवर कोलकातामध्ये उपचारांच्या निमित्ताने आले होते. 13 मे रोजी अनवर यांची हत्या झाल्याची खात्री झाल्यानंतर शाहीन नेपाळ-दुबईमार्गे अमेरिकेला पसार झाला आहे. शाहीन याच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे.

मुंबईत दिली सुपारी

पश्चिम बंगाल पोलिसांनी कसाई जिहाद हवलदार याला अटक केली आहे. या हत्येचा सूत्रधार अकतारुजमा याने हवलदार यास खास मुंबईत बोलावून घेतल्याचेही चौकशीतून पुढे आले आहे. हवलदार याला पाच कोटींच्या सुपारीतील रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम मिळाल्यानंतर तो कोलकात्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता.

मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिले

13 मे रोजी अमान नामक व्यक्तीच्या कोलकाता येथील फ्लॅटमध्ये अनवर यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पॉलिथीन बॅग आणि ट्रॉली सुटकेसचा वापर करण्यात आला होता. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी कोलकात्यातील काही भागांत हे तुकडे फेकून देण्यात आले. ब्लिचिंग पावरडद्वारे फ्लॅटमधील रक्ताचे डाग पुसण्यात आले होते. शीलास्ती हिने एका शापिंग मॉलमधून ब्लिचिंग पावडर आणि पॉलिथीन बॅग, ट्रॉली सुटकेस आणल्याचेही तपासातून पुढे आले आहे.

Back to top button