IND vs WI : यशस्वीचे पदार्पणात शतक, रोहित शर्माही फॉर्मात; भारत चहापानापर्यंत २ बाद २४५ | पुढारी

IND vs WI : यशस्वीचे पदार्पणात शतक, रोहित शर्माही फॉर्मात; भारत चहापानापर्यंत २ बाद २४५

रोसेयो (डॉमिनिका); वृत्तसंस्था :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना यशस्वी जैस्वालने चांगलाच गाजवला. त्याने भारतासाठी कसोटी पदार्पण करताना शतक झळकावले. पदार्पणात शतक करणारा तो सतरावा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मानेही शतकी खेळी करून आपणही फॉर्मात परतल्याचे दाखवून दिले. या दोघांच्या शतकांच्या जोरावर भारताने मजबूत स्थिती प्राप्त केली असून चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 2 बाद 245 धावा झाल्या होत्या. भारताकडे यावेळी 95 धावांची आघाडी होती. यशस्वी जैस्वाल 116 धावांवर तर विराट कोहली 4 धावांवर खेळत होता. रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला. त्याने कसोटीतील दहावे शतक झळकावले. शुभमन गिलने निराशा केली. तो 6 धावांवर बाद झाला. (IND vs WI)

भारताने पहिल्याच दिवशी सामन्यावर पूर्णपणे आपले वर्चस्व राखले होते. रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डावात वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळले.

वेस्ट इंडिजने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय काही संघाच्या पथ्यावर पडला नाही आणि संघ अगदी थोडक्यात ऑलआऊट झाला. त्यानंतर भारताने दिवसअखेरीस नाबाद 80 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळीही ही भागीदारी फुलली. उपहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या बिनबाद 146 धावा झाल्या होत्या. रोहित 68 आणि यशस्वी जैस्वाल 62 धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजकडून पदार्पण करणारा अ‍ॅलिक अथानागेच भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला. मात्र, त्याचे अर्धशतक हुकले. 47 धावा करून तो डावातील अश्विनचा चौथा बळी ठरला. अश्विनने दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात तेजनारायण चंद्रपॉल (12) आणि कर्णधार क्रेग ब्रेथवेट (20) यांना बाद केले, तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळत असलेल्या शार्दूल ठाकूरने (15 धावांत एक विकेट) रॅमन रेफरला यष्टिरक्षक इशान किशनकडून झेलबाद केले. तर लंच ब्रेकच्या आधी जडेजाने जर्मेन ब्लॅकवूडला (14) बाद केले. (IND vs WI)

दुसर्‍या सत्राच्या चौथ्या षटकात जडेजाने जोशुआ डॅसिल्वा (2) याला आर्म बॉल कट टाकला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कड घेऊन किशनच्या ग्लोव्हजमध्ये गेला. यानंतर अथानागेला अनुभवी जेसन होल्डरने चांगली साथ दिली. एका टोकाला साथीदार भक्कम उभा राहिल्यानंतर अथानागेचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने जडेजा आणि अश्विनविरुद्ध शानदार चौकार मारले. या डावखुर्‍या फलंदाजाने अश्विनविरुद्धही षटकार ठोकला. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी 108 चेंडूंत 41 धावांची भागीदारी सिराजने मोडली. सिराजच्या बाऊन्सरला षटकार मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेग बाऊंड्रीजवळ शार्दूलने होल्डरला झेलबाद केले. अश्विनने अल्झारी जोसेफला (चार) बाद करून आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या विकेटस्ची संख्या 700 वर नेली आणि नंतर अथानागेची चांगली खेळी संपवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात जडेजाने केमार रोचला (एक) तर अश्विनने जोमेल वॅरिकनला (एक) बाद करून वेस्ट इंडिजच्या डावावर शिक्कामोर्तब केले. रहकीम कॉर्नवॉल 19 धावांवर नाबाद राहिला. (IND vs WI)

वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी पदार्पण करणारे भारतीय

177 – रोहित शर्मा, कोलकाता (2013)
134 – पृथ्वी शॉ, राजकोट (2018)
100 – यशस्वी जैस्वाल रोसेयू (2023)
भारतासाठी पदार्पणात शतक करणारे युवा फलंदाज
18 वर्षे 329 दिवस : पृथ्वी शॉ (2018)
20 वर्षे 126 दिवस : अब्बास अली बेग (1959)
20 वर्षे 276 दिवस : गुंडाप्पा विश्वनाथ (1969)
21 वर्षे 196 दिवस : यशस्वी जैस्वाल (2023)
21 वर्षे 327 दिवस : मो. अझरुद्दिन (1984)

पदार्पणात शतक करणारा सतरावा भारतीय

भारताकडून पदार्पणात पहिले कसोटी शतक हे लाला अमरनाथ यांनी 1955 साली झळकावले होते. त्यानंतर यशस्वी हा पदार्पणात शतक झळकावणारा 17 वा खेळाडू ठरला आहे.

  • यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने दुसर्‍या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर गिअर बदलला अन् वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. विंडीजच्या पहिल्या डावातील 150 धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी व रोहित या जोडीने 150+ धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येचा सलामीवीरांनी विकेट न टाकता प्रथमच आघाडी घेण्याचा विक्रम आज केला. या दोघांनी वेस्ट इंडिजमध्ये भारताकडून सर्वोत्तम सलामीच्या भागीदारीची नोंद केली. यशस्वीने आज शतकी खेळी करून पराक्रम केला.
  • यशस्वी व रोहित या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या अर्धशतकांनी अनेक विक्रम मोडले. 17 वर्षांनंतर वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच भारतीय सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर दोघांची खेळाची गती वाढवली अन् दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. ऑक्टोबर 2019 नंतर प्रथमच भारताच्या सलामीवीरांनी 150+ भागीदारी केली. यशस्वी-रोहितने 160 वी धाव घेताच मोठा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट इंडिजमध्ये 17 वर्षांनंतर भारताकडून झालेली ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली.
  • यशस्वीने आज 49 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. परदेशात किंवा तटस्थ ठिकाणी भारतीय सलामीवीराने पदार्पणात सर्वोत्तम खेळीचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने सुधीर नाईक यांचा 77 (वि. इंग्लंड, 1974) विक्रम मोडला. या विक्रमात मयंक अग्रवाल (76 वि. ऑस्ट्रेलिया, 2018), सुनील गावस्कर (67* वि. वेस्ट इंडिज, 1971) यांचा विक्रम मोडला. (IND vs WI)

हेही वाचा :

Back to top button