IND vs WI 1st Test : विंडीजची त्रेधातिरपिट; अश्विनच्या फिरकीने विंडीजचा डाव १५० धावांत गुंडाळला | पुढारी

IND vs WI 1st Test : विंडीजची त्रेधातिरपिट; अश्विनच्या फिरकीने विंडीजचा डाव १५० धावांत गुंडाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : गतवैभवाची बरीच लक्तरे उडालेल्या विंडीज संघाचा पहिला डाव चांगलाच गडगडला आणि भारताविरुद्ध घरच्या मैदानावर १५० धावांवर समाधान मानावे लागले. आघाडी व मधल्या फळीतील फलंदाजांनी ठराविक अंतराने बाद होण्याचा सिलसिलाच सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर कोणताच पर्याय बाकी राहिला नाही. त्यामुळे पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारताने प्रत्यत्तरात एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत नवोदित यशस्वी जैस्वालने नाबाद ४० तर रोहित शर्माने ३० धावा केल्या. अनुभवी, फिरकी अष्टपैलू अश्विनने यजमान संघाला चार झटके दिले.

विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, प्रारंभापासूनच मोठ्या पडझडीला सामोरे जावे लागल्याने हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे सुस्पष्ट झाले. प्रारंभी, ब्रेथवेट (२०) व टी. चंदरपॉल (१२) यांना स्वस्तातच बाद होत परतावे लागले. टी. चंदरपॉलचा अश्विनने त्रिफळा उडवला तर ब्रेथवेटने अश्विनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माकडे सोपा झेल दिला. तिसन्या स्थानावरील रेमन रायफरला शार्दूलने इशान किशनकरवी २ धावांवर झेलबाद केले. इशानसाठी हा यष्टीमागे कसोटी क्रिकेटमधील पहिला बळी ठरला होता. भारतातर्फे अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६० धावांत ५ फलंदाजांना बाद केले. तर रविंद्र जडेजाने २६ धावात ३ विकेट्स घेतल्या.

रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या डावात भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी नेत्रदीपक फटके मारले. यशस्वी ७३ चेंडूत ४० धावा करून नाबाद आहे. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार लगावले. त्याचबरोबर रोहितने ६५ चेंडूत ३० धावा केल्या आहेत. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. भारत पहिल्या डावात वेस्ट इंडिजपेक्षा ७० धावांनी पिछाडीवर आहे. टीम इंडिया आज दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

कुंबळेचा विक्रम मोडला

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक त्रिफळाचीतचा कुंबळेचा विक्रम अश्विनने मोडला असून आतापर्यंत त्याने ९५ फलंदाजांना त्रिफळाचीत केले आहे. या यादीत कुंबळेच्या खात्यावर ९४ बळी असून कपिलदेव ८८ बळींसह तिसऱ्या तर ६६ बळींसह शमी चौथ्या स्थानी विराजमान आहेत.

कसोटीत पिता-पुत्रांना बाद करणारा आर. अश्विन पाचवा गोलंदाज

अनुभवी, फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विन बुधवारी एका खास यादीत स्थान संपादन करणारा पहिला भारतीय ठरला. तो कसोटी क्रिकेटमध्ये पिता- पुत्र जोडीला बाद करणारा जागतिक क्रिकेटमध्ये पाचवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, इयान बोथम, वासिम आक्रम, मिशेल स्टार्क, सायमन हार्मर यांनी असा पराक्रम गाजवला आहे. २०११ मध्ये शिवनरेन चंदरपॉलला बाद केलेल्या अश्विनने बुधवारी टी. चंदरपॉलला बाद करत या यादीत स्थान मिळवले. आश्चर्याची बाब म्हणजे, अश्विनप्रमाणेच स्टार्क व हार्मर यांनीही चंदरपॉल पिता-पुत्रांना बाद करत यात स्थान मिळवले आहे

Back to top button