गतवर्षीच्या खड्ड्यांत पुन्हा वृक्षलागवड ! | पुढारी

गतवर्षीच्या खड्ड्यांत पुन्हा वृक्षलागवड !

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील मांडवे खुर्द येथे गतवर्षी लावलेल्या खड्ड्यांत वृक्ष शिल्लक नसल्याचे दैनिक पुढारीने चव्हाट्यावर आणले. त्यानंतर त्याच खड्ड्यांत पुन्हा मजुरांकडून वृक्षलागवड सुरू करण्यात आली आहे. मात्र, यासाठी वृक्ष आणले कुठून? त्याच खड्ड्यांत पुन्हा वृक्ष लागवड करून शासनाचे लाखो रूपये कोणाच्या घशात घातले? याची चौकशी होणे गरजेचे आहे. याप्रकरणी दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर थेट कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

तालुक्याचा दुर्गम भाग असलेल्या मांडवे खुर्द येथे कागदोपत्री वृक्षलागवड केल्याचे दाखवून, अधिकार्‍यांनी लाखो रूपये हडप केल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभाग खडबडून जागा झाला. डोंगरावर वृक्ष शिल्लक नसल्याने, त्या ठिकाणी पुन्हा वृक्षलागवड करून गतवर्षीची वृक्षलागवड व्यवस्थित असल्याचे भासविण्याचा खटाटोप वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरू केला. 14 मजुरांच्या साहाय्याने त्या डोंगरावर पुन्हा वृक्ष लागवड सुरू करण्यात आली. त्यासाठी पाच हजार रोपे तेथे आणण्यात आली. तीन दिवसांत तीन ते चार हजार रोपे लावण्यात आली असून, अजून चार हजार रोपे लागण्याची शक्यता आहे.

ही आठ ते नऊ हजार रोपे कुठून आणण्यात आली, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. डोंगरावर 11 हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यातील 80 टक्क्यांहून अधिक झाडे गायब झाल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वन विभागाने संबंधित खड्ड्यांत वृक्षलागवडीचा सपाटा चालू आहे.

अधिकार्‍यांना वरिष्ठांचा आशीर्वाद?
एकदा झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा दुसरी चूक अधिकारी करत आहेत. मात्र, त्यासाठी शासनाची लाखो रूपयांची उधळपट्टी होणार आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष नाही. त्यांनी मांडव्याच्या डोंगरावर येऊन पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याने, त्यांचाही या अधिकार्‍यांना आशीर्वाद आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा : 

बंडखोरांनी परत यावे, मी राज्यातून निघून जाईन : जितेंद्र आव्हाड

Nashik Murder : देवाची गादी चालवणाऱ्या महिलेचा भक्तानेच केला खून

Back to top button