रस्त्यांचे वाढते जाळे ! | पुढारी

रस्त्यांचे वाढते जाळे !

मिलिंद सोलापूरकर

देशातील महामार्ग आणि उड्डाणपुलांचे वाढते जाळे हे भारताच्या विकासाचे चित्र म्हणून समोर येत आहे. देशभरात रस्त्याचे जाळे एवढ्या वेगाने वाढत आहे की, रस्त्यांच्या नेटवर्कबाबत भारत जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. केंद्रीय परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या नऊ वर्षांत राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ५९ टक्क्यांनी वाढली आहे.

मंत्री गडकरी यांनी सांगितले की, २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी ९१,२८७ किलोमीटर होती आणि ती २०२२-२३पर्यंत १,४५, २४० किलोमीटर झाली आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्याचा पायाभूत रचनेशी थेट जोडलेला असतो. रस्ते आणि महामार्ग या अत्यावश्यक पायाभूत सुविधा आहेत. या माध्यमातून केवळ सामान्य लोकांची सुविधा होत नाही, तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होतो. दळणवळणाच्या विकासामुळे पैसे आणि वेळेची बचत होते. कृषी, कारखानदारी, व्यापार आणि पर्यटनसारख्या क्षेत्रांची क्षमता आणि उत्पादकतेत वाढ होऊ शकते. रस्त्यासंदर्भातील कोणतीही नवीन योजना किंवा प्रकल्प हा परिसरात असणाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांसाठी विकासाची संधी म्हणून समोर येत असते. नवे मार्ग आल्याने वाहन आणि प्रवाशांची वर्दळ वाढते. पेट्रोल पंप, हॉटेल, रेस्टॉरंट, टोल नाका यासारख्या गोष्टींची जागा लागते आणि त्यामुळे स्थानिक लोकांना उत्पन्नाचे नवे साधन मिळते आणि रोजगार निर्मितीही होते. रस्त्यांचे चांगले जाळे ही कोणत्याही देशांची प्रतिमा उंचावण्याचे काम करते. परिणामी, परकी गुंतवणूकदेखील आकर्षित होऊ शकते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणांचा फेब्रुवारीत एक बाँड जारी केला या बाँडला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबई स्टॉक एक्स्चेंजमध्ये पहिल्याच दिवशी सातपटीने अधिक सबस्क्राईब झाला. यावरून देशातील रस्तेनिर्मितीच्या कामाचा धडाका आणि गुंतवणूक लक्षात येते. रस्त्यांचे जाळे विस्तारताना रस्ते सुरक्षेवाबाबतही गंभीर होण्याची गरज आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या मते, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २०११ मध्ये १,४२, ४८५ होती, ती २०१९ मध्ये वाढत १,५१, ११३ झाली. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असणाऱ्या समृद्धी महामार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत. नागपूरहून पुण्याकडे जाणारी खासगी बस शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास अपघातग्रस्त झाली आणि त्यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात हे वेगवान प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र, परिवहनमंत्री गडकरी यांनी देशातील अपघाताचे प्रमाण २०२५ पर्यंत निम्म्यावर आणत ते २०३० पर्यंत शून्य करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. अर्थव्यवस्था आणि समाजाचे फायदे पाहता रस्त्याची बांधणी आणि निर्मिती या दोन्ही गोष्टी सुरू राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी रस्त्यांची देखभाल आणि त्यावरून धावणारे आयुष्य याच्याही सुरक्षेवरून सजग राहणे महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या

रस्त्यांचे जाळे हे कोणत्याही देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पडत असते. दळणवळण योग्य पद्धतीने होण्यासाठी आणि एका भागातील माल अन्यत्र विशेषतः दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी खूप मदत होते. आधुनिक काळात देशातील रस्त्यांचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे वस्तू ने-आण करणे सुलभ झाले आहे. रस्ते मार्ग हा देशातील महत्त्वाचा मार्ग आहे. यावरूनच मोठ्या प्रमाणावर वस्तूंची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे रस्ते मार्गावरील प्रवास सुरक्षित असणेही तितकेच महत्त्वाचे असते. मंत्री गडकरी यांनी यामुळेच रस्ते विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्याकडे असलेल्या विकासाच्या व्हिजनमुळे देशातील रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे, हे विशेष! रस्ते विकासाबरोबर त्यावर होणारे अपघातही टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नियमावली तयारी करून विशेष काळजी करण्याची गरज आहे.

हेही वाचा : 

Back to top button