‘अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह मिळणार नाही, धनुष्यबाणही लवकरच ठाकरेंचा?’; सुप्रीम कोर्टातील जेष्ठ वकिलाचा दावा | पुढारी

'अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह मिळणार नाही, धनुष्यबाणही लवकरच ठाकरेंचा?'; सुप्रीम कोर्टातील जेष्ठ वकिलाचा दावा

पुढारी ऑनलाईन: खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यावरून युद्ध सुरू झाले आहे. दोघांनीही एकाच दिवशी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. अजित पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे 35 आमदार आणि शरद पवारांच्या बैठकीला फक्त 7 आमदार हजर होते, असा दावा केला जात आहे.

अशातच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर दावा सांगणारी याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आळायची आणि सुमारे ४० आमदार, खासदारांच्या समर्थनाचे प्रतिज्ञापत्र असलेली अजित पवार गटाकडून भारतीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहेत. शरद पवार गटाकडून यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर निवडणूक आयोगाने काही महिन्यांपूर्वी ज्या आधारावर शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली, त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळेल अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. ही चर्चा सुरु असताना जेष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी एक मोठा दावा केला. सिब्बल यांनी ‘द वायर’शी बोलताना म्हटले की, अजित पवार यांना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळणार नाही. अजित पवार ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही.

या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे की, शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांच्या जवळ राहणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल देताना म्हटले आहे की, विधानसभेतील किंवा संसदेतील सदस्यांच्या संख्येवर पक्ष कोणाचा हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यासाठी संघटनेत कोणाचे बहुमत आहे, हे पहिले पाहिजे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना चिन्ह देताना निवडणूक आयोगाने जो आमदारांच्या संख्येचा आधार घेतला आहे, तो आता संपला आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे यांना लवकरच मिळू शकते, असंही सिब्बल म्हणाले. या प्रमाणेच केवळ आमदारांच्या संख्येवर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह घड्याळ हे मिळणार नसल्याचं कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं आहे.

खासदार शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद निवडणूक आयोगात पोहचला आहे. लवकरच निवडणूक आयोग कार्यवाही सुरु करू शकतो. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटात जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे, हे निश्चित.

हेही वाचा:

Rahul Gandhi defamation case : राहुल गांधी यांच्यावरील मानहानीच्या खटल्याचा उद्या गुजरात उच्च न्यायालय देणार निकाल

पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? सोनिया, राहुल गांधी यांची भेट घेतल्याची दिल्लीत चर्चा | Pankaja Munde

Netherlands Qualify for World Cup : नेदरलँड्स वनडे विश्वचषकासाठी पात्र! आता भारताशी सामना

 

Back to top button