Netherlands Qualify for World Cup : नेदरलँड्स वनडे विश्वचषकासाठी पात्र! आता भारताशी सामना | पुढारी

Netherlands Qualify for World Cup : नेदरलँड्स वनडे विश्वचषकासाठी पात्र! आता भारताशी सामना

पुढारी ऑनलाईन डेस्क : Netherlands Qualify for World Cup : भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील दहाव्या संघावर शिक्कामोर्तब झाला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा संघ भारतामधील विश्वचषकासाठी पात्र ठरला होता. त्यानंतर आता अजून एक संघ या विश्वचषकासाठी पात्र ठरला असून टीम इंडियाशी या संघाला दोन हात करावे लागणार आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकसाठी घेण्यात आलेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात गुरुवारी नेदरलँड्सने स्कॉटलंडचा 4 गडी राखून पराभव केला आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा 10 वा संघ बनला. त्याचवेळी, क्वालिफायरद्वारे या स्पर्धेत पात्र ठरणारा हा संघ श्रीलंकेनंतरचा दुसरा संघ ठरला.

बास डी लीडे नेदरलँड्सच्या विजयाचा नायक (Netherlands Qualify for World Cup)

स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात नेदरलँड्सचा अष्टपैलू खेळाडू बास डी लीडे चमकला. त्याने शानदार अष्टपैलू कामगिरी केली आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. लीडेने या सामन्यात 123 धावांची खेळी केली आणि त्यानंतर 5 विकेट्सही घेतल्या. आता विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सचा संघ 11 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाला भिडणार आहे.

या सामन्यात स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन मॅकमुलेनच्या 106 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 9 बाद 277 धावा केल्या. नेदरलँडला विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 42.5 षटकांत 6 गडी गमावून सहज गाठले. याचबरोबर डच संघाने पाचव्यांदा विश्वचषकाचे तिकीट बुक केले.

विश्वचषकात सहभागी होणार ‘हे’ 10 संघ (Netherlands Qualify for World Cup)

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांनी या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले होते. त्यानंतर आणखी दोन संघांचा निर्णय विश्वचषक पात्रता फेरीतून झाला. यात श्रीलंका आणि नेदरलँड्सने आपले स्थान पक्के केले.

Back to top button