पुणे : गुंडाना सोडू नका, अन्यथा गय नाही; पोलिस आयुक्तांचा ठाणे प्रभारींना इशारा | पुढारी

पुणे : गुंडाना सोडू नका, अन्यथा गय नाही; पोलिस आयुक्तांचा ठाणे प्रभारींना इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही गँगस्टर, गुंडाना सोडू नका. आलेल्या तक्रारींची तत्काळ दखल घ्या, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक बरोबरच प्रसंगी कठोर कारवाई करा. यापुढे शहरात तोडफोड, कोयता हल्ला, दहशतीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. जर असे प्रकार वारंवार एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले, तर त्याची सहकारनगर पोलिस ठाण्याप्रमाणे गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला आहे.

वारजेतील रामनगर परिसरातील गोळीबार असो की, सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने वाहनांची तोडफोड करत घातलेला धुडघूस. या घटना घडल्यानंतर दोन-तीन दिवसांचा कालावधी लोटतोय तोपर्यंतच सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळक्याने वाहनांची तोडफोड करत घरावर दगडफेक केली. तर थेट सदाशिव पेठेसारख्या गजबजलेल्या भागात आणि पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर एकाने तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले.

त्यामुळे पोलिसांना नागरिकांच्या टीकेचे धनी व्हावे लागले. या घटनांची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) सूचना दिल्या आहेत. यामुळे ठाणे प्रभारींचे धाबे दणाणले आहेत. सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांनादेखील सूचना दिल्या असून, या सर्व बाबींवर त्यांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

त्यामुळे आयुक्तांच्या सूचना मिळताच प्रत्येक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांनी तत्काळ आपल्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक बोलावून चौकीपासून ते आलेल्या प्रत्येक तक्रारींची गंभीर दखल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे हद्दीतील प्रत्येक चौकी पूर्णवेळ कशी सुरू राहील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तर खास मडीबीफच्या (तपास पथक) पथकांना गुन्हेगारांचा वावर असलेल्या परिसरात तैनात केले आहेत.प्रत्येक गुन्हेगारांची त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

तक्रारींची गांभीर्याने दखल न घेणे भोवणार..

सहकारनगर परिसरातील तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडण्यापूर्वी याबाबत चार अदखलपात्र (एनसी) गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, तत्कालीन पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि त्यांच्या अधिकारी,कर्मचार्‍यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत दोन गटांत वाद झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करत, दगडफेक करत दहशत निर्माण केली. या घटनेचे तीव्र पडसात उमटले.

जर सुरुवातीलाच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक बरोबरच कठोर कायदेशीर कारवाई केली असती, तर हा प्रकार घडला नसता असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आले. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेत थेट तत्कालीन पोलिस निरीक्षक, गुन्हे निरीक्षक, डीबी प्रभारी अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचारी अशा सात जणांचे एकाच दिवशी निलंबन केले. त्यांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे सर्व ठाणे प्रभारींनी धास्ती घेतली आहे.

सहकारनगरचे बदली, निलंबन हे समीकरणच

यापूर्वीदेखील सहकारनगर पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी आणि गुन्हे निरीक्षकांवर तत्कालीन पोलिस आयुक्तांनी कारवाई केली होती. मे 2021 मध्ये एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्यानंतर त्याची सहकारनगर परिसरातून अंत्ययात्रा निघाली होती. त्यामध्ये दीडशे ते दोनशे दुचाकीस्वार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या कालावधीत हा प्रकार घडला होता. त्यावेळी पोलिसांवर सर्व स्तरातून मोठी टीका झाली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी दोघांची तेथून उचलबांगडी केली होती. त्यानंतर आता हा तोडफोडीचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा

बीड : धायगुडा पिंपळा शिवारात आयशर टँम्पो चालकास लुटले; चालकावर केले तलवारीने वार

Drawned Death : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू

सोलापूर : सांगोल्यात स्मशानभूमीतील शव दाहिनी स्टॅन्ड चोरीला!

Back to top button