खडकवासला : कष्टकरी कुटुंबांतील गायत्रीने जर्मनीत फडकावला तिरंगा | पुढारी

खडकवासला : कष्टकरी कुटुंबांतील गायत्रीने जर्मनीत फडकावला तिरंगा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला परिसरातील कोल्हेवाडी येथील कष्टकरी कुटुंबांतील गायत्री भालेराव हिने जर्मनीतीन बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष ऑलिंपिक दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताचा तिरंगा फडकवला आहे. सिंगल टेबल टेनिस स्पर्धेत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

इयत्ता दहावीत शिकणार्‍या गायत्री हिने स्पर्धेसाठी केलेली निवडी सार्थक ठरवली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खडतर संघर्षाचा सामना करत तिने यशाचे शिखर सर केले आहे. दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत गायत्री हिने एका पाठोपाठ एक सामने जिंकत अंतिम लढतीत नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

तसेच सिंगल टेबल टेनिस स्पर्धेत अटीतटीच्या लढतीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गायत्री ही औंध येथील बालकल्याण संस्थेत इयत्ता दहावीत शिकत आहे. प्रशिक्षक अशोक नांगरे, अशोक जाधव, संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे व आईच्या मार्गदर्शनाखाली गायत्री ही टेबल टेनिसचा सराव करत आहे. खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते, संजय मते, सागर कोल्हे आदींसह नागरिकांनी गायत्रीचे अभिनंदन केले.

हेही वाचा

पुणे-पानशेत रस्त्यांची पावसामुळे लागली वाट !

नगर : प्रश्न सोडवणुकीसाठी शिक्षक संघ हाच पर्याय : शिक्षक नेते बापूसाहेब तांबे

सोलापूर : उजनीतील गाळ काढण्यास मुहूर्त कधी?

Back to top button