नगर : प्रश्न सोडवणुकीसाठी शिक्षक संघ हाच पर्याय : शिक्षक नेते बापूसाहेब तांबे | पुढारी

नगर : प्रश्न सोडवणुकीसाठी शिक्षक संघ हाच पर्याय : शिक्षक नेते बापूसाहेब तांबे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील प्राथमिक शिक्षकांची सर्वांत बलाढ्य संघटना असून या संघटनेतच आमचा जन्म झाला आहे. पंधरा वर्षांपूर्वी राज्यात निर्माण झालेल्या गटबाजीतून संघाचे मोठे नुकसान झाले. ज्यांच्या सोबत आम्ही गेलो, त्यांनी पंधरा वर्षांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गटबाजी वाढवली. शिक्षकांच्या हिताचा कोणताही प्रश्न सुटला नाही. आपल्या वैयक्तिक सेवेसाठी जिल्ह्या-जिल्ह्यात सेवेकरी निर्माण करून शिक्षक संघाचा बट्ट्याबोळ केला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघप्रेमी शिक्षकांनी कै. शिवाजीराव पाटील व कै. भा. दा. पाटील गुरुजी यांनी वाढविलेल्या मूळ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघामध्ये सक्रिय होऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. येणार्‍या काळामध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक संघाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे महामंडळ अधिवेशन रविवारी (2 जुलै) नगरमध्ये होत असून, ज्येष्ठ नेते शरद पवार त्यात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पवार यांंनी शिक्षक संघाच्या मागणीनुसार शिक्षकांचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न आतापर्यंत सोडवले आणि भविष्यातही त्यांच्याशिवाय पर्याय नसल्याने शिक्षक संघाची ताकद पवारांच्या मागे उभी आहे. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षक संघाच्या माध्यमातून आता सक्रिय होणार आहेत, असे ही बापूसाहेब तांबे यांनी सांगितले. शिवाजीराव पाटलांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मूळ शिक्षक संघामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय गुरुमाऊली मंडळाच्या 25 जूनच्या सभेत झाला. त्यानुसार दोन तारखेच्या महामंडळामध्ये जिल्ह्यातील पाच हजार प्राथमिक शिक्षक उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

दोन तारखेला होणार्‍या शिक्षक संघाच्या महामंडळ अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव, उच्च अधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव फुंदे यांनी केले आहे. शिक्षक बँकेचे चेअरमन संदीप मोटे, गोकुळ कळमकर, माजी चेअरमन सलीमखान पठाण, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, राजेंद्र सदगीर, किसन खेमनर, विकास मंडळाचे अध्यक्ष विलास गवळी, बँकेचे व्हाईस चेअरमन कैलास सारोक्ते यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मातृसंस्था कधीही श्रेष्ठ

दिवंगत शिवाजीराव पाटील आणि भा. दा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जडणघडण झालेला शिक्षक संघ जणू आताच्या सर्व संघटनांची मातृृसंघटना आहे. या संघटनेने आतापर्यंत शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामुळे ही संघटना श्रेष्ठ असून तिच्यासोबत जाणे गुरुजींच्या हिताचे आहे, असे शिक्षक नेते दत्ता पाटील कुलट यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सोलापूर : उजनीतील गाळ काढण्यास मुहूर्त कधी?

Mumbai Police : भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना अटक

Back to top button