पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले | पुढारी

पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  स्टेअरिंग फेल झाल्याने पुणे ते लासलगाव ही धावती एसटी बस थेट महामार्गावरून बाजूच्या खड्ड्यात जाऊन मोठ्या दगडाला धडकली. त्यामुळे बसमधील 75 ते 80 प्रवाशी बालंबाल बचावले. काही प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (दि. 28) दुपारी सव्वातीन वाजता घडला. बसचालक निवृत्ती रामभाऊ हांडगे हे बुधवारी सकाळी त्यांच्या ताब्यातील पुणे ते लासलगाव ही एसटी बस (एमएच 14 बीटी 4118) घेऊन लासलगावच्या दिशेने जात होते. या वेळी बसमध्ये 75 ते 80 प्रवाशी होते. दुपारी सव्वातीन वाजता बस एकलहरे गावाजवळ आली असता बसचालक हांडगे यांना स्टेअरिंग फेल झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत बसवर कसेबसे नियंत्रण मिळवले.

मात्र, तोपर्यंत बस महामार्गावरून बाजूच्या खड्ड्यात जाऊन मोठ्या दगडाला धडकली आणि थांबली. बसचालक हांडगेंच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 75 ते 80 प्रवाशांचे प्राण वाचले. हांडगे व वाहक एस. एस. सानप यांनी बसमधील प्रवाशांना इतर बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना केले.

एसटी महामंडळाने जीर्ण झालेल्या बस भंगारात काढाव्यात. नव्या बस खरेदी करून प्रवाशांना चांगली सुविधा देणे गरजेचे आहे. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. त्यांच्याशी विचारपूस केली असता घटना कशी घडली हे त्यांनासुद्धा कळले नसल्याचे सांगितले. काही प्रवाशांना डोक्याला, हाताला किरकोळ मार लागला आहे.
                                 – मयूर भालेराव, अध्यक्ष, युवा आधारवड फाउंडेशन

एसटी बस दगडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. जर बस तशीच पुढे गेली असती तर 500 मीटरवर घोड नदीचा पूल होता. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.
                                                                        – उषा कानडे, सरपंच, कळंब. 

हे ही वाचा :

Very Heavy Rainfall: पश्चिम किनारपट्टी, घाट क्षेत्रात ढगांची दाटी; अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे : ‘पोक्सो’तील आरोपी वर्षभरापासून पोलिसांना सापडेना !

Back to top button