पुणे : ‘पोक्सो’तील आरोपी वर्षभरापासून पोलिसांना सापडेना !

पुणे : ‘पोक्सो’तील आरोपी वर्षभरापासून पोलिसांना सापडेना !
Published on
Updated on

भिगवण (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील भिगवण भागातील एका अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी व आपली अल्पवयीन मुलगी तब्बल एक वर्षापासून सापडत नसल्याने कुटुंब अक्षरशः हवालदिल झाले आहे. पोलिसांसह राजकीय नेते खूप सहानुभूती दाखवत आहेत. पण, वर्षानंतर आपली मुलगी सापडत का नाही? मग हा कसला तपास आणि सहानुभूती आहे? असे संतप्त सवाल संबंधित मुलीच्या कुटुंबातील लोकांनी केले आहेत. आपली मुलगी सुरक्षित आहे की तिचे काही बरेवाईट झाले आहे? या चिंतेने या कुटुंबाला अक्षरशः ग्रासले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिगवण परिसरातील एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी 2022 मध्ये दिली. त्यानंतर या मुलीला फूस लावून एका मुलाने पळवून नेल्याचे समोर येताच भिगवण पोलिसांनी संबंधित युवकाविरोधात 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पोलिस व कुटुंबातील लोकांनी त्यांचा अनेकदा शोध घेण्याचा प्रयत्न केला. एक-दोनवेळा तर हातात आलेला आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला.

अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या या प्रकाराला आता तब्बल एक वर्ष होत आले आहे, तरीही ना अल्पवयीन मुलगी सापडत आहे, ना आरोपी. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, ग्रामीण पोलिस अधीक्षक, बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी आदींना निवेदन देऊन आरोपीला अटक करावी व मुलीला ताब्यात द्यावे, यासाठी निवेदने दिलेली आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी मदत केली आहे की नाही, असे नाही. पण, आमच्या सहनशीलतेला काही मर्यादा आहेत. आज वर्षानंतरही या प्रकरणात काहीही हाती लागत नसल्याने कुटुंबातील लोकांना या व्यवस्थेविषयी आता विश्वास राहिला नाही. आमचा किती अंत पाहणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे मुलीचे आई-वडील व नातेवाईक अक्षरशः सैरभैर झाले आहेत. त्यामुळे कोण न्याय देईल का? असा आक्रोश ते करीत आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news