Lok sabha Election 2024 Results : सोलापूरच्या लेकीने घेतला पित्याच्या पराभवाचा बदला | पुढारी

Lok sabha Election 2024 Results : सोलापूरच्या लेकीने घेतला पित्याच्या पराभवाचा बदला

संगमेश जेऊरे

सोलापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचार करताना आधी आई (उज्ज्वला शिंदे), त्यानंतर वडील (सुशीलकुमार शिंदे) आणि आता लेक (आ. प्रणिती शिंदे) यांचा पराभव निश्चित असल्याचा प्रचार केला होता; परंतु 2003 मध्ये आई उज्ज्वला शिंदे, 2014, 2019 मध्ये सलग दोनवेळा वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवाचा बदला लेकीने म्हणजेच प्रणिती शिंदे यांनी यंदाच्या निवडणुकीत घेतला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्यापुढे एक पाऊल टाकल्याचे निकालावरून दिसून येते.

मागील सलग दोन लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदा लेकीसाठी सुशीलकुमारांनी 50 वर्षांचा राजकीय अभ्यास पणाला लावला होता. दोन महिने प्रणिती शिंदे या थेट मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत होत्या, तर भाजपने मात्र प्रचाराची जबाबदारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांवर सोपविली; परंतु यंदाच्या लोकसभा निकालात काँग्रेसने बाजी मारल्यानंतर भाजपचा भ्रमनिरास झाला.

सन 2014 ची स्थिती

सन 2014 साली सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांच्या विरोधात भाजपने अ‍ॅड. शरद बनसोडे यांना उमेदवारी दिली. याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्याकडून अ‍ॅड. बनसोडे पराभूत झाले होते; परंतु 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शहर मध्यमध्ये आ. प्रणिती शिंदे, मंगळवेढा-पंढरपूर येथे आ. भारत भालके, मोहोळ मतदारसंघात आ. लक्ष्मण ढोबळे, दक्षिण सोलापूर मतदारसंघात आ. दिलीप माने असे पाच काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार होते. तेव्हा अक्कलकोटमध्ये आ. सिद्रामप्पा पाटील, सोलापूर शहर उत्तरमध्ये आ. विजयकुमार देशमुख हे दोनच भाजपचे आमदार होते. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे चार आमदार असूनही सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले होते.

पाच आमदार असूनही सातपुतेंचा पराभव

यंदाच्या सोलापूर लोकसभेच्या निकालानंतर 10 वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय बदलाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. यात काँग्रेस जिंकली असून भाजप पराभूत झाला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाच आमदार असतानाही तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता, तर 2024 मध्ये भाजप महायुतीचे पाच आमदार असतानाही भाजप उमेदवार आ. राम सातपुते यांना पराभूत व्हावे लागले आहे.

सन 2024 ची स्थिती

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाच आमदार आहेत. शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे या एकमेव आमदार आहेत. अक्कलकोटमध्ये आ. सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर उत्तरमध्ये आ. विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरमध्ये आ. सुभाष देशमुख, पंढरपूर-मंगळवेढ्यात आ. समाधान आवताडे हे चार भाजपचे, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. यशवंत माने असे पाच आमदार भाजप महायुतीचे असूनही लोकसभा निवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला आहे.

Back to top button