पिंपरी : पहिल्याच पावसात संसर्गजन्य आजारांत वाढ | पुढारी

पिंपरी : पहिल्याच पावसात संसर्गजन्य आजारांत वाढ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पहिल्याच पावसात संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर 35 अंश तापमान हे 23 अंशावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो.

कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व कुंद वातावरणामुळे कणकणी येणे, अनुत्साही वाटणे, डोकेदुखी अशा आजारात वाढ झाली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे.

उपाययोजना काय कराल ?

  • सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
  • घरातील लहान मुलांचे लसीकरण झाले नसल्यास ते करून घ्यावे.
  • घरातील मोठ्या माणसांसाठी देखील हिपेटायटीस ए, बी, कॉलरा, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू आदी आजारांवरील लसी घेतल्या आहे की नाही ते पहावे.
  • घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, याची काळजी घ्यावी.

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

  • पावसाळ्यात गढूळ पाणी येते. पाणी गाळून, उकळून प्यावे. वॉटर प्युरिफायर व्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास सुरक्षा आणखी वाढते.
  • शाळकरी मुलांनी पाण्याची बाटली घरून न्यावी. बाहेरचे पाणी शक्यतो टाळावे. उघड्यावरील पदार्थ, हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे.
  • मांसाहार, मसालेदार पदार्थ, वातजन्य पदार्थ टाळावे.
  • सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब आदी आजार स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याच्या फंदात पडू नये.
  • डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.
  • एका रुग्णासाठी आणलेले औषध आपल्या बुद्धीने दुसर्‍या रुग्णास देऊ नये.

सध्या तरी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरण दूषित झाले आहे. रुग्णालयात सर्दी, जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी, श्वसन विकारात वाढ झाली आहे. तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. पावसात भिजू नये, याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे.

– डॉ. किशोर खिलारे, अध्यक्ष, जनआरोग्य मंच.

हेही वाचा

पिंपरी : परप्रांतातील केवळ 1425 वाहनांची ‘आरटीओ’कडे नोंद

पुणे : दामिनी पथके, बीट मार्शलची संख्या वाढणार

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार प्रतिटन ३,०८० रुपये

Back to top button