जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार प्रतिटन ३,०८० रुपये | पुढारी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार प्रतिटन ३,०८० रुपये

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाला देण्यात येणार्‍या एफआरपीमध्ये प्रतिटन 100 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च 750 रुपये वजा जाता शेतकर्‍यांना एफआरपी 3,080 ते 90 रुपये मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 10.25 टक्के साखर उतार्‍यास 3150 एफआरपी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा सरासरी 12.25 टक्के मिळतो. सरकारचे वाढीव 100 रुपये आणि मिळणारा साखर उतारा याचा हिशेब करता शेतकर्‍यांना प्रतिटन 3,840 रुपये एफआरपी मिळू शकते; पण त्यातून ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च 750 रुपये वजा जाता एफआरपी 3080 ते 90 रुपये मिळणार आहे. वाढलेले खताचे दर, कीटकनाशके, मनुष्यबळाचे दर याचा विचार करता ही दरवाढ तुटपुंजी आहे. यातून फारसा लाभ मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रतिटनास 100 रुपये वाढ करून शेतकर्‍यांना मोठी मदत केली असल्याचा डांगोरा केंद्र सरकार पिटत आहे. दहा रुपयांची वाढ कोणत्या आधारे केली? उत्पादन खर्च कोणता धरला? ही वाढ डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागण्यातील प्रकार आहे.
– राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

एफआरपी देशातील सर्वच राज्यांत दिली जात नाही. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये एमएसपी दिली जाते. आता जी 100 रुपये दरवाढ केली ती उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यांचा विचार करून दिलेली आहे. शंभर रुपयांची वाढ म्हणजे राजा उदार झाला आणि भोपळा हाती आला असा प्रकार आहे. एफआरपीमध्ये 100 नव्हे तर 1 हजार रुपये वाढ व्हायला हवी होती. तरच शेतकर्‍यांना लाभ मिळाला असता.
– रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना.

कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीप्रमाणे ज्या ज्यावेळी एफआरपी वाढेल त्या त्या वेळेस त्या प्रमाणात साखरेच्या दरातही एमएसपीमध्ये वाढ करणे जरूरीचे आहे. खर्चावर आधारित ताबडतोब साखरेची एम.एस. पी. 3800 ते 4000 प्र. क्विंटलपर्यंत वाढीचा निर्णयही केंद्र शासनाकडून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील गाळप हंगाम सुरू करणे अडचणीचे ठरणार आहे.
– पी.जी. मेढे, साखर उद्योग अभ्यासक

केंद्र सरकारने उसाच्या दरात वाढ केली आहे. पण खते, औषधे, मजुरी याचा विचार करता हवी दरवाढ पुरेशी वाढत नाही. त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर 2019 पासून साखरेच्या खरेदीच्या दरात वाढ झालेली नाही. सध्या कारखान्याच्या साखरेला प्रतिक्विंटल 3300 दर कारखान्यांना मिळतो, त्यात 300 रुपयांनी वाढ करून हा दर 3600 प्रतिक्विंटल करावा, अशी अपेक्षा साखर उद्योजकांची आहे.
– विजय औताडे, माजी कार्यकारी संचालक

Back to top button