पुणे : कोरोनाने रद्द मुंजीची भरपाई मिळणार ; दाम्पत्याला ग्राहक आयोगाचा दिलासा | पुढारी

पुणे : कोरोनाने रद्द मुंजीची भरपाई मिळणार ; दाम्पत्याला ग्राहक आयोगाचा दिलासा

शंकर कवडे:

पुणे : हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी तेरावा संस्कार म्हणजे मुंज. त्यासाठी शहरातील गोडबोले दाम्पत्याने जोरदार तयारी सुरू केली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार मुलाच्या मुंजीचा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर त्यांनी मुंजीसाठी बुक केलेल्या बँक्वेटकडे डिपॉझिट स्वरूपात भरलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. बँक्वेटवाल्यांनी त्यास नकार दिल्याने त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. अखेर आयोगाने दाम्पत्याच्या बाजूने निकाल देत डिपॉझिट स्वरूपात दिलेले एक लाख तीनशे रुपये व्याजासकट देण्याचा निकाल दिला.

अमित गोडबोले यांनी मुलाच्या मुंजीसाठी 24 मे 2020 रोजी शिवाजीनगर येथील रॉयल बँक्वेटमधील सभागृह 1 लाख 300 रुपये देऊन बुक केले. यादरम्यान, कोरोनाचा शिरकाव वाढल्याने शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. शासनाच्या नियमावलीमुळे कार्यक्रम करणे शक्य नसल्याने गोडबोले यांनी बँक्वेटवाल्यांकडे बुक केलेली रक्कम परत देण्याची विनंती केली. मात्र, बँक्वेटवाल्यांनी ती न दिल्याने त्यांनी रॉयल बँक्वेट व संचालक सिध्दार्थ मराठे यांना कायदेशीर नोटीस पाठवत ग्राहक आयोगात धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली. बँक्वेटवाल्यांनी तक्रारदाराची तक्रार खोटी असल्याचे नमूद करीत हॉलची रक्कम 85 हजार व त्यावरील 18 टक्के जीएसटी, असे मिळून 1 लाख 300 रुपये देण्यास नकार दिला. मात्र, न्यायालयाचा आदेश त्यांना मान्य करावा लागला.

लॉकडाऊन लागल्यानंतर बँक्वेटकडून 15 एप्रिल रोजी फोनद्वारे कार्यक्रमाबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, गोडबोले यांनी मेसेजद्वारे कार्यक्रम करणार नसल्याचे सांगितले. गोडबोले यांनी स्वत:हून कार्यक्रम रद्द केला असल्याने बँक्वेटच्या अटी-शर्तींनुसार रक्कम परत करण्याची तरतूद नाही. तसेच, आपल्याकडून कोणतीही त्रुटीयुक्त सेवा दिली नसल्याचा बचाव बँक्वेटवाल्याकडून आयोगात करण्यात आला.

शासनाच्या अध्यादेशानुसार नुकसानभरपाईस पात्र
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत व राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रक व अध्यादेशात कोरोना काळात कोणत्याही दिलेल्या रकमेबाबत कोणतीही सेवा अथवा लाभ स्वीकारला नसल्यास संबंधित रकमेची कपात न करता संपूर्ण रक्कम परत करण्यात यावी, असे नमूद केले आहे. गोडबोले यांनी स्वत:हून हा कार्यक्रम रद्द केला नसून नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना तो करावा लागला आहे. त्यांनी वारंवार विनंती करूनही रक्कम परत न करणे ही बाब बँक्वेटवाल्यांनी त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे स्पष्ट करते, असा निष्कर्ष अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, सदस्य शुभांगी दुनाखे यांच्या खंडपीठाने काढला.

बुकिंग केलेल्या रकमेसह द्यावा लागणार तक्रारीचा खर्चही
गोडबोले यांना बुकिंग स्वरूपात दिलेली रक्कम 13 मे 2020 पासून द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्याच्या 45 दिवसांच्या आत परत करावी; अन्यथा त्यावर 8 टक्के व्याज द्यावे लागेल. याखेरीज एकत्रित नुकसानभरपाईपोटी 25 हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये आदेशाची प्रत मिळाल्याच्या 45 दिवसांत द्यावी, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

धक्कादायक ! मुलीला स्वत:चं नाव देण्यासाठी बापानेच उकळले 12 लाख रुपये

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला पळविणारे दोघे गजाआड

Back to top button