कोल्हापूर : तुळशी धरणातील पाणीसाठा वाढवण्याची नागरिकांतून मागणी | पुढारी

कोल्हापूर : तुळशी धरणातील पाणीसाठा वाढवण्याची नागरिकांतून मागणी

धामोड; रवि पाटील : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणे कोरडी पडली आहेत. यंदा जून महिन्यात संपुर्ण जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. साडेतीन टीएमसी क्षमता असलेल्या तुळशी धरणातील गाळ काढून त्याची पाणीक्षमता एक ते दिड टीएमसी वाढवल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे.

धामोड (ता. राधानगरी) येथील तुळशी धरणाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. लोंढा नाला प्रकल्पातुन व लहान मोठ्या ओढ्यांतुन धरणात पाणी येणाऱ्या ठिकाणी मात्र गाळाचे प्रमाण जास्त आहे . धरण क्षेत्रात असलेल्या मातीच्या मोठ – मोठ्या टेकडया व गाळ काढला तर अर्धा ते एक टीएमसी पाणीसाठ्याची वाढ होऊन भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल. सद्य स्थितीला धरणात मृतसाठा वगळता केवळ अर्धा टीएमसी पाणी शिल्लक असलेने धरण कोरडे पडले आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बैठक घेऊन धरणात अर्धा ते एक टीएमसी पाणीसाठा वाढवणे तांत्रिकदृष्टया शक्य असल्यास तात्काळ उपाय योजना राबवण्याची मागणी तुळशी काठच्या नागरीकांमधून होत आहे .

फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय जल आयोग समितीच्या अधिकार्‍यांनी गाळ निरीक्षण करण्यासंदर्भात सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल जलसंपदा विभागाला प्राप्त झालेला नाही. प्राप्त होताच योग्य ती कार्यवाही केली जाईल.
खंडेराव गाडे, शाखा अभियंता, तुळशी धरण धामोड

तुळशी मध्ये एक ते दिड टीएमसी पाणीसाठा वाढवणे तांत्रीक दृष्टया शक्य असेल तर त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी पुरेसा निधी देऊ
आम प्रकाश आबिटकर

        हेही वाचलंत का ? 

Back to top button